पुणे – अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत धान्य मिळण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तहसीलदारांच्या बनावट सहीने उत्पन्नाचे दाखले तयार केले जात असल्याचे प्रकार शहरात उघडकीस आले आहेत.
लॉकडाऊनमुळे रेशनकार्डवर धान्य घेणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. त्यानुसार वार्षिक 59 हजारांपेक्षा कमी उत्पन्न असल्यास कुटुंबांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळू शकतो. त्याकरिता 59 हजार वार्षिक उत्पन्न असल्याचा दाखला घेण्याकरिता नागरिकांकडून अर्ज येत आहे. याद्वारे दाखल्याची सत्यता पडताळणी केली असता त्यामध्ये बोगस दाखले बनविले जात असल्याचे समोर आले आहे.
पुणे शहर तहसील कार्यालयात धनकवडी येथे राहात असलेल्या एका व्यक्तीने 55 हजार रुपयांचा दाखला अर्जासोबत जोडला. या दाखल्यावर मौजे धनकवडी असा उल्लेख असून खाली डिजिटल सही हवेली नायब तहसीलदार यांच्या नावाची असून दाखल्याच्या वरील भागात पुणे शहर तहसील असे लिहले आहे.
प्रत्यक्षात मात्र धनकवडी गावचा समावेश हा हवेली तालुक्यात होतो. तर, ज्या अधिकाऱ्याच्या नावाचा उल्लेख केला असून त्यांचे कार्यक्षेत्र हे पुणे शहर तहसील आहे. यावरून या बोगस दाखल्याचा शोध लागला आहे. याप्रकरणी पुणे शहर तहसीलदार यांनी संबंधित पोलीस यंत्रणेला माहिती दिली आहे.