प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 10 -लष्करामध्ये वरिष्ठ अधिकारी असल्याची बतावणी करीत तरुणांना लष्करात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने अटक केली. हा बोगस अधिकारी कर्नल असल्याचे सांगत फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे.
संजय रघुनाथ सावंत (वय 55, रा. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सावंत हा देहूूरोड परिसरातील लष्कराच्या “डीओडी’ डेपोमध्ये ट्रेडमन म्हणून नोकरीला होता. दोन वर्षांपूर्वी तो सेवानिवृत्त झाला आहे. त्यानंतर त्याने इतर काही साथीदारांसोबत मिळून तरुणांची फसवणूक केली. पठाणकोट येथे लष्करामध्ये नोकरीला लावतो, असे सांगून चार ते पाच विद्यार्थी तसेच काही पालकांकडून सुमारे 20 ते 25 लाख रुपये उकळले. यानंतर तो फरार झाला. याबाबत पठाणकोटमध्ये गुन्हा दाखल असून, दोन आरोपींना यापूर्वी ताब्यात घेण्यात आलेले आहे. तर, सावंत याचा शोध सुरू होता. सावंत हा पुण्यातील रहिवासी असल्याने आर्मी इंटेलिजन्सकडून पुणे पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली होती.
युनिट चारचे पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विकास जाधव, हवालदार राजस शेख, प्रवीण भालचिम, संजय आढारी यांचे पथक सावंत याच्या मागावर होते. या दरम्यान सावंत हा सध्या पिंपळे गुरव येथे राहत असून, तेथेच रिक्षा चालविण्याचे काम करीत असल्याची माहिती पथकाला मिळाली. सलग आठ दिवस पिंपळे गुरव परिसरातील दीडशे ते दोनशे रिक्षांची तपासणी करून पथकाने सावंत याला ताब्यात घेतले.
गुन्ह्याचा तपास पठाणकोट पोलीस करीत असल्याने योग्य ती कार्यवाही करून सावंत याला पठाणकोट पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.