मावळ – विधानसभा निवडणुकीमुळे ग्रामीण भागात असलेली हॉटल आणि ढाब्यांवर दारूचा महापूर वाहत असला तरी अशा काही परवाना नसलेल्या ढाब्यांमधून बनावट मद्य विक्री केली गेल्याची चर्चा आता कार्यकर्तेच करू लागले आहेत. या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, निवडणुकीच्या कालावधीत बनावट मद्याची विक्री तालुक्याच्या ग्रामीण भागात अधिक प्रमाणात झाली असल्याचे समजते. ग्रामीण पोलिसांकडून असे मद्य पकडण्याकरिता विशेष मोहीमही राबविण्यात आली तरी निवडणुकीच्या कालावधीत याचे प्रमाण वाढल्याचे कार्यकर्त्यांचेच म्हणणे आहे.
ग्रामीण भागात मद्य विक्रीचे प्रमाण वाढले आहे. निवडणुकीच्या कालावधीत तर यामध्ये दुप्पट वाढ झाली. निवडणूक कालावधीत होणाऱ्या खास पार्ट्यांसाठी मद्याचा साठा अनेकांनी करून ठेवला होता. हीच संधी साधून विशिष्ठ ब्रॅंडच्या बनावट मद्याची विक्री केली गेली असल्याचे सांगितले जात आहे. ग्रामीण भगात विशेषत: महामार्ग, राज्यमार्गालगतच्या परवाना नसलेल्या ढाब्यांवर अशा प्रकारचे बनावट मद्य विक्री झाल्याची चर्चा आता जोरात आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका आर्थिक वर्षात ग्रामीण भागातून मद्य व्यवसायापोटी कोट्यवधींचा महसूल मिळतो. सध्या, बिअर शॉपीचे परवाने तर सहज मिळत असल्याने या व्यावसायांतून मिळणाऱ्या महसुलातही वाढ होत आहे. मद्य उद्योगावर कडक नियंत्रण ठेवले जात असल्यानेच महसुलात वाढ होत आहे.