मुंबई – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. येत्या १० जून रोजी आदित्य ठाकरे प्रभू रामचंद्राचं दर्शन घेणार आहे. अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज ट्विटरद्वारे दिली.
यातच आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याआधी अयोध्येत शिवसेनेकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. या पोस्टरबाजीतून शिवसेनेने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘असली येत आहे, नकली पासून सावधान’, अशा शब्दांमध्ये शिवसेनेने पोस्टरच्या माध्यमातून राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
दरम्यान,आज (8 मे, रविवार) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांचा खरपूस समाचार घेतला, ‘खोट्या भावनेने अयोध्येला जाणार्याला श्रीरामाचा आशीर्वाद मिळणार नाही, असे सांगितले. राज ठाकरे राजकीय हेतूने अयोध्येला जात आहेत, तर आदित्य ठाकरे मनात श्रद्धा घेऊन श्री रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत.’ असे संजय राऊत म्हणाले.
आदित्य ठाकरे यांच्या अयोध्येत आगमनासाठी शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू आहे. अयोध्येतील नयाघाट परिसरात शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे पोस्टर आणि बॅनर लावण्यात आले आहेत. या पोस्टर्स आणि बॅनरमध्येही राज ठाकरेंना टोमणे मारण्यात आले आहेत. त्यात लिहिले आहे, ‘खरी येत आहे, खोट्यापासून सावधान!’ सध्या हे पोस्टर सोशलवर चांगलेच चर्चेत आले आहे.