पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नावाने फेसबुकवर फेक अकाउंट उघडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकाऊंट बनवणाऱ्याने जगताप यांच्या नावासह प्रेसिडेंट एनसीपी पुणे असाही उल्लेख केला होता. प्रशांत जगताप यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे.
जगताप यांच्या नावाने ओपन केलेल्या अकाउंटवरून एका व्यक्तीचा नाव आणि मोबाईल क्रमांकासह काही मजकूर शेअर करण्यात आला आहे. याविरोधात सायबर पोलिसांत तक्रार दाखल केल्याचे देखील प्रशांत जगताप यांनी अधिकृत सोशल मीडियावरून स्पष्ट केले आहे. जगताप यांच्या फेक अकाऊंटवरून काही पोस्ट देखील शेअर करण्यात आल्या आहेत. आर्थिक लाभासाठी या फेक अकाऊंटच उपयोग केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
“Prashant Jagtap presidet Ncp pune या नावाने सुरू केलेल्या फेसबुक अकाउंटमधून माझ्या नावाचा वापर करत काही संशयास्पद आर्थिक जाहिरात केली जात आहे. याबाबत मी पुणे पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे” अशी माहिती जगताप यांनी आपल्या सोशल मीडियावरून दिली. तसेच कुणीही संबंधित व्यक्ती सोबत आर्थिक व्यवहार करू नये असे आवाहन देखील यावेळी जगताप यांनी केले आहे.