वाद मिटविण्यात पवारांना अपयश

रामराजे यांचे “नो कॉमेन्टस’
वयामुळे मान; नाही तर जीभ हासडली असती ः खा. उदयनराजे

मुंबई – साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांच्यातील अंतर्गत वाद सोडवण्यात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना अपयश आलेले दिसत आहे. शरद पवारांसोबत सुरु असलेली बैठक अर्ध्यावर सोडून उदयनराजे बाहेर आले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना उदयनराजेंनी अत्यंत खालच्या शब्दात रामराजेंवर निशाणा साधला.

“रामराजे निंबाळकर वयाने मोठे आहेत, म्हणून त्यांचा मान राखला. माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून बाहेर काढली असती. कुणाचंही ऐकून घ्यायला मी काही बांगड्या भरल्या नाहीत,’ अशा शब्दात उदयनराजेंनी आपला संताप व्यक्त केला. “मी उदयनराजे आहे, महाराजांच्या घरात जन्म घ्यायला नशीब लागतं,’ असेही ते म्हणाले.

रामराजेंनी चक्रम संबोधल्यामुळेही उदयनराजेंचा तीळपापड झाला. “मी आहे चक्रम…. लोकांवर अन्याय झाला की मी होतो चक्रम. पिसाळलेल्या कुत्र्यासोबत राहिलं तर मला रेबीज होईल’ अशा शब्दात उदयनराजेंनी चीड व्यक्त केली. शरद पवारांना जो निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ देत, पण मी सहन करणार नाही, असे त्यांनी सांगितले. बैठकीनंतर बाहेर आलेल्या रामराजे निंबाळकरांनी कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं. ‘नो कमेंट्‌स’ असं म्हणत रामराजेंनी काढता पाय घेतला.

नीरा देवघर धरणाच्या पाण्यावरुन उदयनराजेंनी राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला होता. रामराजे निंबाळकर यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. स्वार्थासाठी त्यांनी 14 वर्ष बारामतीला पाणी पळवलं. जमिनी लाटण्यासाठी काहींनी लोकांना पाण्यापासून दूर ठेवलं, असा गंभीर आरोप उदयनराजेंनी केला होता. उदयनराजेंवर 302 चे गुन्हे दाखल आहेत. त्यांनी जरा छत्रपतींसारखं वागावं, असं म्हणत रामराजे नाईक निंबाळकरांनी उदयनराजेंवर पलटवार केला होता. सगळी संस्थानं खालसा झाली. संस्थानं खालसा झाल्यावर कुणी छत्रपती लावतं का? आताचे छत्रपती स्वयंघोषित आहेत. लोक महाराज म्हणतात म्हणून आम्ही महाराज म्हणतो. ते छत्रपतींचे वंशज आहेत हे मान्य आहे, मात्र छत्रपती असल्यासारखं वागा. कमीत कमी सूर्याजी पिसाळासारखं वागू नका, एका बाजूला एक बोलायचं दुसऱ्या बाजूला एक बोलायचं, अशा शब्दात रामराजे निंबाळकरांनी उदयनराजेंवर टीका केली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here