बंधारा, समांतर पुलाचा विषय मार्गी लावण्यात प्रशासनाला अपयश

नगरसेवक संदीप वाघेरे यांची पालिका आयुक्तांवर आगपाखड
पिंपरी  (प्रतिनिधी) – सलग दोन वर्षे मागणी करूनही पिंपरी गावातून पिंपळे सौदागरकडे जाण्यासाठी समांतर पूल उभा करणे गरजेचे आहे. तसेच पिंपरी येथे पवना नदीवर बंधारा उभारल्यास पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागण्याची शक्‍यता असतानाही या दोन्ही विकासकामांकडे पालिकेने केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आयुक्तांची भेट घेऊन आगपाखड केली. नागरिकांच्या समस्या सोडविण्यात आलेले अपयश हे आयुक्तांच्या कारकिर्दीतील दुर्देवी बाब असल्याचेही वाघेरे यांनी म्हटले आहे.

पिंपरीगाव, कॅम्पातून पिंपळे सौदागरकडे जाण्यासाठी सध्या असलेला पूल हा लहान होत असल्याने तसेच वाहतूक वाढल्याने या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या वाढली आहे. सातत्याने येथे होत असलेल्या “जाम’मुळे वाहनधारक वैतागले आहेत. येथील वाहतुकीची समस्या सुटावी यासाठी समांतर पुल उभारण्याची मागणी गेल्या दोन वर्षांपासून संदीप वाघेरे हे करीत आहेत. तसेच पवना नदीवर पिंपरीगाव परिसरात कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधल्यास महापालिकेने डेअरी फार्म परिसरात केलेल्या वृक्षारोपणासाठी पाण्याचा वापर करणे सोयीचे ठरणार आहे. तसेच वापरासाठी लागणारे पाणी या ठिकाणाहून रहिवाशांना उपलब्ध करून देता येणार आहे.

या दोन्ही मागण्यांचा गेल्या दोन वर्षांपासून वाघेरे हे पाठपुरावा करत असून त्याबाबत आयुक्त आणि प्रशासनाला अनेकवेळा स्मरणपत्रही दिले आहे. मात्र प्रशासन अथवा आयुक्तांनी याची दखल न घेतल्यामुळे वाघेरे यांनी नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे “ग’ क्षेत्रीय समितीच्या बैठकीमध्ये वाहतूक कोंडीची समस्या सुटावी यासाठी समांतर पूल उभारण्यास मंजुरीही देण्यात आली आहे. असे असतानाही ही कामे मार्गी लागत नसल्याबद्दल वाघेरे यांनी आयुक्तांची भेट घेऊन नाराजी व्यक्त करताना विकासकामे करण्यात जाणीवपूर्वक अडथळा आणल्याबद्दल आगपाखड केली. लोकप्रतिनिधी या नात्याने प्रभागातील कामे मार्गी लागावीत, अशी आपली प्रामाणिक धारणा असून आयुक्तांनी हे दोन्ही विषय मार्गी न लावल्यास यापुढे आयुक्तांविरोधात कडक भूमिका घेतली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×