राजगुरुनगर, (प्रतिनिधी) – खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला उमेदवारी मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये चलबिचल झाली असून पवार गटाचे इच्छुक अतुल देशमुख बंडखोरी करून अपक्ष लढणार का, हे पाहणे औत्स्युक्याचे आहे.
खेड-आळंदीचे तिकीट ठाकरे गटाला गेल्याच्या शक्यतेने राजगुरूनगर येथे अतुल देशमुख समर्थकांचा रविवारी (दि.27) मेळावा झाला या मेळाव्याला मोठ्या संख्येने तालुक्यातील युवावर्ग उपस्थित होता.
त्यात देशमुख यांनी त्यांची बाजू मांडली तिकिटासाठी सहकारी कसे विरोध करीत होते याचा पाढा वाचून दाखवला. या मेळाव्यात अतुल देशमुख यांना उमेदवारी द्या अशी एकमुखी मागणी तरुणांनी केली असून आता बस ! आता थांबायचे नाही तर लढायचे आहे असा आग्रह अतुल देशमुख यांच्या चाहत्यांनी धरल्याने आता देशमुख यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
अतुल देशमुख म्हणाले की, शरद पवार यांनी खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात पक्षाकडून शेवट पर्यंत माझ्या नावाला पहिला क्रमांक दिला आहे.
खासदार सुप्रिया सुळेयांची मोठी मदत झाली, डॉ. अमोल कोल्हे यांनी माझे नाव लावून धरले. मात्र तालुक्यातीलच महाविकास आघाडीतील काहींनी माझ्या नावाला विरोध दर्शवला. ते मुंबईत जाऊन बसले आहेत. निवडणुकीबाबत पवारांसोबत राहणार आहोत.
मात्र माझी भूमिका लवकरच स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. खेड विधानसभा मतदारसंघात परिवर्तनाची लाट असताना बरोबरच्या साथीदारांनी साथ सोडून विरोध केला.
माझ्या तालुक्यातील माझ्या मतदारसंघातील सर्व सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे या भावनेतून माझी उमेदवारी होती. मात्र शपथ घेतलेल्यांनीच दगा दिला. शरदचंद्र पवार सांगतिल तसे काम आगामी काळात केले जाईल, असे त्यांनी नमूद केले.
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय…
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. प्रत्येकाला वाटतंय मला आमदार व्हावे. आपल्या आमदारकीच्या स्वार्थापोटी तालुक्यातील जनतेचे हित पायदळी तुडवत आहे.हि भावना आमदारकीची स्वप्न पाहणार्यानी पहिली पाहिजे.
तालुक्यातील निकाल अतुल देशमुख बदलू शकतो ही वस्तू स्थिती सर्वाना माहिती आहे. पाच वर्षे तर आमदार राहील; परंतु पुढेही देशमुख होतील या भीतीपोटी माझ्या नावाला शरदचंद्र पवार पक्षातील काही मोठ्या नेत्यांचा विरोध असल्याचे देशमुख यांनी नमूद केले.