कांदा निर्यातबंदीबाबत देवेंद्र फडणवीसांचे पियुष गोयल यांना पत्र

मुंबई – केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. केंद्राच्या या निर्णयावर शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याचं पाहायला मिळतंय. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी आता शेतकरी तसेच राजकीय नेत्यांकडून करण्यात येत आहे.

अशातच आज राज्याचे विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदा निर्यातबंदीच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबाबत वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल यांना एक पत्र लिहलं आहे. या पत्राद्वारे फडणवीस यांनी, कांदा निर्यातबंदीचा निर्णय केंद्र सरकारने त्वरित मागे घ्यावा अशी मागणी केली आहे.

“महाराष्ट्रातील कांद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली मागणी असते. यामुळे शेतकर्याना योग्य भाव देखील मिळतो. मात्र निर्यातबंदीच्या निर्णयामुळे शेतकरी दुःखी आहे. मी आशा करतो की आपण हा निर्णय मागे घ्याल.” अशी मागणी फडणवीस यांनी पत्राद्वारे केली आहे.

तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील केंद्राने निर्यातबंदीचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी करणारे पत्र गोयल यांना लिहले होते.

केंद्र सरकारच्या निर्णयावर शेतकऱ्यांची नाराजी

दरम्यान, केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदीचा निर्णय घेतला आणि ही निर्यातबंदी तातडीने लागू करण्याचं परिपत्रक काढण्यात आले. गेल्या काही दिवसांत कांद्याचे दर वाढू लागले होते. निर्याबंदी लागू केल्याने जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. निर्यात बंदीमुळे कांद्याच्या बाजारभावात किंटलमागे 500 ते 600 रुपयांची घसरण झाली आहे.

केंद्राच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयावर संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तत्काळ निर्यात पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक दिवस बाजार समित्या बंद होत्या. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या कांद्याच्या चाळी बाजारपेठ अभावी खराब झाल्या. त्याचबरोबर गेल्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे कांद्याच्या रोपवाटिका नष्ट झाल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.