“फडणवीसांना कधीही टरबुज्या म्हंटलं नाही, मात्र…”

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना, “राष्ट्रवादीने देवेंद्र फडणवीस यांना कधीही टरबुज्या म्हंटलं नाही” असं स्पष्ट केलं. “पण चंद्रकांतदादांच्या नावाचा शॉर्टफॉर्म ‘चंपा’ असा होतो. त्यामुळे त्यांनी या गोष्टीचा राग मानून घेऊ नये.” असंही ते म्हणाले. पुण्यात आज  पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरूण लाड यांच्या प्रचारार्थ मेळावा झाला. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

“राजकारणात येण्यापूर्वी मला पवार मोठे नेते वाटायचे, मात्र आता कळाले ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो,’ असे वक्‍तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू नेते असल्याचे कौतुकही केले. मात्र, पाटील यांच्या या वक्तव्यावर रविवारी दिवसभर राज्य भरातून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवली. त्यानंतर पाटील यांनी सारवासारव करत “पवार साहेबांचा अनादर करण्याचा हेतू नसून, राजकीय व्यासपीठावर अनेक नेते अशा प्रकारे बोलतात. टीका करतात, ते गांभीर्याने घेणे चुकीचे आहे,” असे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

“पवार साहेबांबद्दल मी अनेकवेळा चांगले बोललो, त्यांचे कौतुक केले. त्यावेळी कोणी बोलले नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करतात. देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या म्हणतात, तर मला ‘चंपा’ म्हणतात. हे कसे चालते?” असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला होता.

चंद्रकांत पाटील यांनी लावलेल्या या आरोपांवर बोलताना जयंत पाटील यांनी, “देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीने कधीही टरबुज्या म्हटलेले नाही. पण चंद्रकांतदादांच्या नावाचा शॉर्टफॉर्म ‘चंपा’ असा होतो. त्यामुळे त्यांनी या गोष्टीचा राग मानून घेऊ नये.” असं उत्तर दिलं.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.