फडणवीस यांनी राजभवनातच खोली घ्यायला हवी : मुश्रीफ

नगर  – करोना महामारीचे संकट गडद आहे. असे असताना भाजपवाले आंदोलनाच्या माध्यमातून राजकारण करण्यात मश्‍गूल आहेत. ही राजकारणाची वेळ नाही. संकटावर मात करण्यासाठी सर्वांच्याच सहकार्याची गरज आहे. अशावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सातत्याने तक्रारींचा पाढा वाचण्यासाठी राज्यपालांकडे जात आहेत. त्यात मलबार हिलवरून राजभवनावर जायला त्यांना वेळ लागतो. त्यामुळे त्यांनी राजभवनातच एक खोली घ्यावी, अशी उपरोधिक टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पालकमंत्री मुश्रीफ यांनी आज जिल्ह्यातील करोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, आमदार नीलेश लंके, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, “”लोकसभा अधिवेशनाच्या काळात 35 लाख लोक विमानाने भारतात आले. ते मुंबई, दिल्ली, अहमदाबाद अशा सर्वच ठिकाणी गेले. केंद्र सरकारने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन त्या 35 लाख लोकांना वेळीच क्वारंटाईन केले असते, तर देशातील लोकांना घरातच बसावे लागले नसते.” नगर जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा धरणांत आजमितीला 37 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांत 33 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील 439 उद्योगांनी जिल्हा प्रशासनाकडून परवानगी घेतली आहे. थोड्याच दिवसांत मोठ्या प्रमाणावर उद्योग सुरू होतील, अशी माहिती पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिली.

मजुरांच्या घरवापसीचा मार्ग मोकळा
राज्यात असलेल्या 30 हजार परप्रांतीयांपैकी 23 हजार 380 जणांना जिल्ह्यातून विशेष रेल्वेने रवाना करण्यात आले आहे. आजही तीन रेल्वे सोडण्यात येणार आहे. त्यामुळे बिहार, राजस्थान, झारखंड, केरळ, उत्तरप्रदेश येथील उर्वरित मजुरांचाही घरवापसीचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती मुश्रीफ यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.