मुंबई: “हे लिव्ह इन रिलेशनशिपचं सरकार आहे. आम्ही पाडायची गरज नाही स्वतःहून पडेल” असे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांच्या टीकेला जोरदार उत्तर दिल आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले, भारतीय माणसाला आणि विशेषतः मराठी माणसाला लिव्ह इन रिलेशन काय असतं, हे माहितीही नाही. यांच्या मनात हे विचार येतातच कसे? हे कोणत्या संस्कृतीचं प्रतिनिधित्व करतात हा प्रश्न आहे. हा भारतीय संस्कृतीतला शब्द नाही. त्यांनी माहिती घ्यावी आणि याबाबतीत आत्मचिंतन करावं” असा सल्ला थोरातांनी देवेंद्र फडणवीसांना दिला.
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे एक कुटुंबाप्रमाणे असल्याचे आपल्याला दाखवले जात आहे. मात्र, खरं तर हे कुटुंब नाहीच आहे. या सरकारमध्ये काँग्रेस आहे. त्यामुळे काँग्रेस हे सरकार चालू देणार नाही. लिव्ह इन रिलेशनशिपमधील हे सरकार अंतर्विरोधानेच पडणार असल्याचा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.