फडणवीसांचे आश्‍वासन “गाजर’च ठरले!

आळंदीकरांचा आरोप : भामा-आसखेडचे पाणी अडीच वर्षांनंतरही आलेच नाही

आळंदी- आळंदीकरांना भामा-आसखेडचे पाणी दिल्याशिवाय राहणार नाही, असे आश्‍वासन अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते; मात्र त्यांचे हे वक्‍तव्य कागदावरच राहिले असल्याने भाजपचे आश्‍वासन “गाजर’च असल्याचे आळंदीकरांचे म्हणणे आहे.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराज यांचा 724वा संजीवन समाधी सोहळा बुधवार (दि. 20) पासून सुरू होत असून तो मंगळवार (दि. 26) पर्यंत साजरा होता होत आहे. त्यानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक अलंकापुरी नगरीत दाखल होत आहेत. त्यामुळे त्यांच्यासह आळंदीकरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय पालिकेला करावी लागत आहे; मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणी कमी पडण्याची शक्‍यता असल्याने भाविकांसह आळंदीकरांना पाणीपुरवण्यासाठी आळंदी पालिकेला तारेवरची कसरत करावी लागणार हे निश्‍चित आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून यात्राकाळात देहू फाटा परिसरात करिता पाणी दिले जाते; मात्र तेही अल्पप्रमाणात मिळत अससल्याचा इतिहास असल्याने ऐन यात्रा काळात वारकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागणे, ही परिस्थिती वारकऱ्यांसह आळंदीकरांना नवीन नाही. त्यामुळे किमान यात्राकाळात तरी पुरेसे पाणी मिळावे, यासाठी यंदातरी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरीत आहे.

आळंदी नगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शुद्ध पाण्याचे “गाजर’ माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आळंदीकरांना दिले होते. शुद्ध आणि मुबलक पाण्याच्या आशेवर आळंदीकरांनी भाजपला भरभरून मतदान करून नगरपालिकेवर “कमळ’ फुलवले होते. मात्र, त्यानंतर केवळ कागदी आश्‍वासनाशिवाय आळंदीकरांना पाण्याचा थेंबही मिळालेला नाही. आता तर मुख्यमंत्रीपदही गेले आहे. तर भामा आसखेड धरणग्रस्तांचे प्रश्‍न सोडवल्याशिवाय पुण्याला पाणी जाऊ देणार नाही, अशी भूमिका धरणग्रस्तांनी दिले आहेत. त्यासाठी अनेकवेळा “जॅकवेल’चे कामही बंद पाडले होते. त्यातच सध्या राज्यात सत्तेचे त्रांगडे फसले असल्याने आळंदीकरांची शुद्ध व मुबलक पाण्यासाठी आणखी किती जन्म वाट पाहावी लागणार असा संतप्त सवाल आळंदीकरांनी उपस्थित केला आहे.

  • नियमीत पाणीही वेळेवर नाही
    भामा आसखेड धरणातून पुणे महापालिकेला जाणाऱ्या बंद जलवाहिनीला कुरूळी येथील जॅकवेलमधून टॅपिंगद्वारे आळंदीकरांना शुद्ध पाणी देऊ, त्यांना हक्‍काचे पाणी मिळवून दिल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही, असे आळंदी नगरपालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांनी आळंदीकरांना खोटी आश्वासने दिली असेच म्हणावे लागेल. आळंदी नगरपालिका मार्फत केला जाणारा पाणीपुरवठा हा देखील तोकडा असून 100 टक्‍के शुद्धीकरणाचा भरोसा नाही, आळंदीकरांना नियमित पाणीपुरवठा वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी आहेत.
  • वडिवळे धरणातून पाणी सोडा
    यंदा सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. खेड तालुक्‍यात ओल्या दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे इंद्रायणी नदी खळखळून वाहत असली तरी यात्रा काळात भाविकांना स्नानासाठी ते कमी असल्याने किमान पवित्र स्नानासाठी भाविकांना स्वच्छ पाणी मिळावे त्यासाठी मावळातील वडिवळे धरणातून थोडे तरी पाणी सोडावे, अशी मागणी आळंदीकरांसह वारकऱ्यांनी केली आहे.
  • 12 महिन्यांत ते काम पूर्ण होणार?
    भामा आसखेड धरणातून पुणे महापालिकेला जाणाऱ्या बंद जलवाहिनीला कुरूळी येथील जॅकवेलमधून टॅपिंगद्वारे आळंदी शहराच्या साडेपाच कोटी रुपये पाणीपुरवठा प्रकल्पास शासनाने अटीशर्तींसह प्रशासकीय मान्यता दिली. हा प्रकल्प कार्यादेश दिल्यापासून बारा महिन्यांत राबविण्याचा आदेश दिला असल्याचे पत्र ऑगस्ट 2019मध्ये आळंदी नगरपालिकेले दाखविले होते; मात्र जलवाहिनेचे कामच भामा आसखेडग्रस्तांनी रोखल्याने हा प्रकल्प 12 महिन्यांत पूर्णत्वास येईल, याबाबत प्रश्‍नचिन्हच आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.