नवी दिल्ली – महाराष्ट्रातील सत्तांतराचे शिल्पकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दिल्ली दरबारी वजन वाढले असून त्यांना केंद्रीय निवड समितीत स्थान देण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी आज केंद्रीय निवड समिती आणि संसदीय मंडळाची घोषणा केली.
नड्डा या अकरा सदस्यांच्या संसदीय मंडळाचे अध्यक्ष असून ही समिती सर्वोच्च निर्णायक समिती आहे. यातून शिवराजसिंह चौहान आणि माजी भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांचे नाव वगळण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीला सत्ताच्यूत करून भाजपचे सरकार स्थापन करणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय निवड समितीत स्थान देण्यात आले आहे.
यामुळे दिल्ली दरबारात त्यांचे महत्त्व वाढले असल्याची चर्चा आहे. संसदीय समितीतील सदस्यांशिवाय भूपेंद्र यादव, ओम माथूर आणि बंथी श्रीनिवास केंद्रीय निवड समितीचे सदस्य आहेत.
फडणवीसांना निवडणूक समितीत मिळाले स्थान
भाजपच्या संसदीय समितीत महाराष्ट्राच्या एकाही नेत्याचा समावेश नसला तरी आजच पक्षातर्फे जी निवडणूक समिती जाहीर करण्यात आली आहे, त्यात मात्र देवेंद्र फडणवीस यांना स्थान देण्यात आले आहे. जे. पी. नड्डा हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीत नरेंद्र मोदी, राजनाथसिंह, अमित शहा, येडियुरप्पा, सर्वानंद सोनोवाल, के लक्ष्मण, सुधा यादव, भूपेंद्र यादव, ओम माथूर यांचा समावेश करण्यात आला आहे. बी. एल. संतोष हे या समितीचे सचिव म्हणून काम पाहतील.
निवडणूक समितीत विविध निवडणुकांमधील भाजपच्या उमेदवारांची यादी फायनल केली जाते. त्यामुळे या समितीलाही पक्षाच्या संरचनेत महत्त्व आहे. यात महाराष्ट्राच्या फडणवीसांना संधी मिळाली असल्याने संसदीय समितीत महाराष्ट्र डावलला गेल्याची कसर यातून भरून निघाली आहे, असे सांगितले जात आहे.