नागपूर – विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात आपण ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांना कधीही कोणतीही गोष्ट गुपचूप सांगितलेली नाही. वडेट्टीवारांनी तशी वक्तव्ये करून बेजबाबदार आणि खोडसाळ राजकारण करू नये, असा टोला केंद्रीय रस्ते व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी लगावला आहे.
नितीन गडकरी म्हणाले, फडणवीस यांच्याविरोधात गडकरी यांनी आपल्याला गुपचूप काही तरी सांगितले, असे वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले आहे. त्यांच्या भाषणाची क्लिप पाहून मला आश्चर्य वाटले. त्यांचे वक्तव्य पूर्णतः निराधार, खोटे आणि बेजबाबदारपणाचे आहे. फडणवीस माझ्यासाठी धाकट्या भावासारखे आहेत. शिवाय, ते माझ्या पक्षातील महत्त्वाचे नेते आहेत.
एकमेकांच्या विरोधात काड्या करणे आणि एकमेकांची जिरवणे ही कॉंग्रेसची परंपरा आहे. त्यामुळे तशा प्रकारचा संभ्रम कॉंग्रेसचे मंत्री वडेट्टीवार आमच्याही बाबतीत निर्माण करू पाहतात, असे गडकरी यांनी सांगितले.
फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात महाराष्ट्राची प्रगती झाली. विरोधी पक्ष नेते म्हणूनही ते उत्तम काम करीत आहेत. महाविकास आघाडीच्या चुकांवर नेमके बोट ठेवून ते लोकशाहीतील विरोधकांचे कर्तव्य निभावत आहेत. सरकार तीन पक्षांचे असले तरी कॉंग्रेसमध्ये नैराश्य आहे. त्यांना सत्तेत कुणीही मोजत नाही. त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी वडेट्टीवार यांच्यासारखे कॉंग्रेसी नेते अशा प्रकारची वक्तव्ये करून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, असा आरोपही गडकरी यांनी केला आहे.
काय म्हणाले होते वडेट्टीवार
देवेंद्र फडणवीस यांची जिरवायची हे नितीन गडकरींशी बोलून आमचं आधीच ठरले होते, असे सनसनाटी वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले. नांदेडच्या बिलोलीतील प्रचारसभेत वडेट्टीवार यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना हा खळबळजनक दावा केला. गडकरी-फडणवीस यांच्यात छत्तीसचा आकडा असल्याचेही ते म्हणाले होते.