आपल्या पक्षाचेच हित जोपासणारे फडणवीस एकमेव- राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई: महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्व मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे हित जपले मात्र आपल्या पक्षाचेच हित जोपासणारे फडणवीस एकमेव मुख्यमंत्री असल्याची टीका, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हेमंत टकले यांनी केली आहे.

गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील तपासावरुन मुंबई हायकोर्टाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फटकारले आहे. मुख्यमंत्री आहात की एका पक्षाचे नेते? विविध खाती सांभाळताना कार्यक्षमताही दाखवा, असे खडे बोलच हायकोर्टाने फडणवीसांना सुनावले आहेत. याचा संदर्भ घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हेमंत टकले यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

भाजपा सरकार आल्यानंतर लोकांना वाटले होते की, महाराष्ट्रात परिवर्तन होईल. पण मुख्यमंत्र्यांनी तब्बल ११ खाती स्वतःकडेच ठेवली आणि त्यात गृहखातेही होते. या सगळ्यात महाराष्ट्राच्या कायदा व सुव्यवस्थेचे इतकी दुर्दशा झाली की, अखेर तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात की एका पक्षाचे, असा सवाल थेट हायकोर्टालाच करावा लागला आहे. त्यामुळे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांपासून प्रत्येकानेच महाराष्ट्राचे हित जपले. पण देवेंद्र फडणवीस यांनी मात्र फक्त आपल्या पक्षाचेच हित जपताना राज्याची दुर्दशा केल्याचा आरोपही टकले यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.