नागपूर – पोलीस अधिकारी सचिन वाझे, मनसूख हिरेन हत्या प्रकरणाानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी केलेल्या आरोपामुळे महाराष्ट्रासह देशाचं राजकारण ढवळून निघालं आहे. महाविकास आघाडीविरुद्ध सातत्याने आक्रमक असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही आता हत्येत सामील असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नागपुरातच हा आरोप करण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फडणवीस यांच्या धरपेठ येथील निवासस्थानाजवळ आंदोलन छेडले आहे. आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्याप्रकरणी फडणवीस यांचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
बहुचर्चित एकनाथ निमगडे हत्याकांडातील मोस्ट वाँटेड गुन्हेगार नब्बू उर्फ छोटे नवाब आणि कालू उर्फ शरद तसेच भरत हाटे या तिघांच्या मुसक्या बांधण्याची प्रशंसनीय कामगिरी नागपूर पोलिसांनी बजावली. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. कोट्यवधीच्या जमिनीच्या वादातून आर्किटेक्ट एकनाथ निमगडे यांची हत्या झाल्याचे सांगण्या येते. ६ सप्टेंबर २०१६ ला सकाळी ७ च्या सुमारास एकनाथ निमगडेची हत्या झाली होती.
यावरून नागपुरात राष्ट्रावादी आक्रमक झाली असून आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी वेदप्रकाश आर्य, वर्षा श्यामकुळे, महेंद्र भांगे, शैलेंद्र तिवारी यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.