मुंबई : ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाची चौकशी सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर दबाव टाकला. हा सरकारी कामातील हस्तक्षेप असून त्यावर काय कारवाई करायची याचा निर्णय सहकाऱ्यांशी चर्चा करून घेऊ, असे सांगत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी फडणवीस यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज मीडियाशी संवाद साधताना हे संकेत दिले. राज्यात 50 हजार रेमडेसिवीरचा साठा येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पुरवठादाराकडे लसीचा पुरवठा करण्याचे पत्र असल्याचे पोलिसांना माहीत नव्हते. सुरुवातीला पुरवठादाराने ते पत्रं दाखवलेही नाही. त्यामुळे पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी बोलावलें. मात्र, ही चौकशी सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे काही सहकाऱ्यांसह पोलीस ठाण्यात पोहोचले. फडणवीसांनी पोलिसांवर दबाव टाकला. शासकीय कामात हस्तक्षेप करण्यात आला. त्यामुळे चौकशीत बाधा आली आहे. या गोष्टी योग्य नाहीत आणि पुढील काळात अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाही, असा इशारा वळसे-पाटील यांनी दिला आहे.
पोलीस कुणचीही चौकशी करू शकतात
यावेळी ब्रुक फार्माच्या मालकाला का बोलावलं? कशासाठी बोलावलं? असा सवाल करण्यात आला. पोलिसांना कुणालाही बोलावण्याचा अधिकार आहे. कुणाचीही चौकशी करू शकतात. त्यामुळे पोलिसांनी ब्रुक फार्माच्या मालकाला बोलावले होते, असे त्यांनी सांगितले.
साठा कुणाला देणार होते? चौकशी करणार
फडणवीस आणि दरेकरांवर गुन्हा दाखल करणार का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर या संदर्भात माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ. याबाबत चौकशी करूनच निर्णय घेऊ, असं त्यांनी स्पष्ट केले. हा साठा सरकारला देण्यात येणार नव्हता. खासगी पार्टीला हा साठा देण्यात येणार होता. एफडीएने लसीचा पुरवठा करण्याची विनंती ब्रुकच्या मालकाला केली होती. त्यावर त्याने असमर्थता दर्शवली होती. त्यामुळे हा साठा कुणाकडे जाणार होता, याची चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितलं. दरम्यान, हा साठा पोलिसांनी जप्त केलेला नाही. हा साठा कंपनीकडेच असून त्याचा वेगळा वापर करणार आहेत की नाही याची चौकशी करण्यात येईल. या कंपनीकडे अधिक साठा असण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
पुन्हा चौकशी करू
फडणवीस यांनी दबाव टाकल्याने ब्रुकच्या मालकाला सोडण्यात आलेलं नाही. तर त्याने परवानगीचं पत्रं दाखवल्याने सोडण्यात आलं आहे. त्याला चौकशीसाठी पुन्हा बोलावू असं पोलिसांनी सांगितलं आहे, अशी माहिती त्यांनी दिली. कुणा मंत्र्याचंया ओएसडीने धमकी दिल्याचं मला माहीत नाही, असंही ते म्हणाले.