- पत्रकार परिषदही ऐनवेळी गुंडाळली
पिंपरी – वर्षपूर्वीनिमित्त भाजप आमदारांच्या सत्काराचा कार्यक्रम पिंपरी चिंचवड शहरात आयोजित केला होता. मात्र देवेन्द्र फडणवीस करोना बाधित असल्याची माहिती मिळाल्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रमानंतर लगेचच काढता पाय घेतला. यामुळे पूर्वनियोजित पत्रकार परिषदही ऐनवेळी रद्द करण्यात आली.
आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्या यंदाच्या पंचवार्षिकमधील आमदारकीला शनिवारी (दि. 24) एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या हस्ते पिंपळे सौदागर येथे सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र कार्यक्रम सुरू असतानाच विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस हे करोना बधित असल्याची माहिती पाटील यांना मिळाली. गेले तीन दिवस पाटील हे फडणवीस यांच्यासोबत पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणी दौऱ्यात सहभागी झाले होते. यामुळे पाटील यांना फडणवीस हे करोना बाधित असल्याची मिळाल्यानंतर पत्रकार परिषद टाळून काढता पाय घेतला.
कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण
चंद्रकांत पाटील हे फडणवीसांच्या तीन दिवस संपर्कात होते. मात्र शनिवारी पिंपळे सौदारमध्ये झालेला कार्यक्रम हा बंदिस्त जागेत एसीमध्ये झाला. यावेळी अनेकजण चंद्रकांत पाटील यांच्या संपर्कात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाबाबत पोलीसही अनभिज्ञ
शहरातील दोन्ही आमदारांच्या सत्काराला पाचशेहून अधिक भाजपचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र आम्ही कोणत्याही कार्यक्रमाला परवानगी दिलेली नाही. तसेच कार्यक्रमाबाबत आम्हाला कळविण्यात आलेले नव्हते, अशी माहिती सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिली. यामुळे बेकायदा गर्दी जमवून करोना प्रसाराला पोषक वातावरण निर्माण केल्याप्रकरणी पोलीस काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.