मुंबई : चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. यावेळी मदतीसाठी आक्रोश करणाऱ्या एका महिलेला मुख्यमंत्र्यांसमोरच दमदाटी केल्यामुळे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर भाजपकडून टीका केली जात आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आता भास्कर जाधव यांच्या या कृतीवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मात्र आता संबंधीत महिलेची प्रतिक्रिया आली असून महिलेने भास्कर जाधवांना ‘रावडी राठौर’ची उपमा दिली.
पूरग्रस्त महिलेला दमदाटी करतानाच भास्कर जाधव यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. देवेंद्र फडणवीसांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. पुरग्रस्तांविषयी चिंता,संवेदनशीलता सर्वानीच दाखवली पाहिजे. मात्र भास्कर जाधवांनी केलेलं वर्तन हे अतिशय धक्कादायक असल्याचे फडणवीस म्हणाले आहे.
दमदाटीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिलेने म्हटलं की, अद्याप आमच्याकडे लाईट नाहीये, माझ्या मोबाईललाही चार्जिंग नाही. त्यामुळे, सोशल मीडियावर काय अपप्रचार करत आहेत, हे मला माहिती नाही. त्यांनी काहीही उद्धट बोलले नाही, ते जे बोलले ते वडिलकीच्या नात्याने बोलले. त्यांचे आणि आमचे चांगले संबंध आहेत. त्यांचा आवाजच ‘रावडी राठोड’सारखा असल्यामुळे ते तसं वाटलं असेल, असं महिलेने नमूद केलं आहे.
भास्कर जाधव हे प्रत्येकवेळी मदत करतात, सगळ्या व्यापाऱ्यांनाही ते मदत करतात. पाहणी करताना ते मदतीच्या भावनेने आले होते, ते काहीही वाईट बोलले नाहीत. त्यांचं बोलणंच तसं आहे. त्यामुळे, चुकीचा अर्थ काढण्यासारखं काहीही नाही, स्वाती भोजने यांनी म्हटलं आहे.
दरम्यान आपण कोणत्याही दबावात हे बोलत नाही. जर दबाव असता तर मी मुख्यमंत्र्यांसमोर आमदार-खासदारांचा पगार काढला नसता, असंही भोजने यांनी नमूद केल.