नागपूर: राज्यात लवकरच लव्ह जिहाद विरोधात कायदा येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नेतृत्वाखाली सात जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात लव्ह जिहाद विरोधात कायदा आणण्याचे कारण सांगितले आहे. फडणवीस हे नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी लव्ह जिहाद विरोधात महायुती सरकार कडक कार्यवाही करणार असल्याचे जाहीर केले.
लव्ह जिहाद याची वास्तविकता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात आली आहे. केरळ उच्च न्यायालयानेही याचा उल्लेख केला आहे. एका धर्मातील व्यक्तीने दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी लग्न करण्यात गैर काही नाही. पण खोटे बोलून खोटी ओळख तयार करून फसवणूक करून लग्न करायचे आणि मुले जन्माला घालून सोडून द्यायचे, ही प्रवृत्ती समाजात पसरत असल्याचे फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.
अशाप्रकारचा कायदा याआधी उत्तर प्रदेश आणि इतर काही राज्यात अस्तित्वात आलेला आहे. आता महाराष्ट्रात देखील लव्ह जिहाद विरोधात कायदा आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
लवकरच लव्ह जिहाद विरोधात कायदा येणार?
बळजबरीने केलेले धर्मांतर रोखण्यासाठी लव्ह जिहाद विरोधात कडक कायदा करण्याची मागणी विविध संघटनांनी सरकारकरडे केली होती. यासंदर्भात सरकारकडे निवेदनही सादर करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यात लवकरच लव्ह जिहाद विरोधात कायदा अस्तित्वात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विद्यमान परिस्थितीचा अभ्यास करून लव्ह जिहादच्या विरोधातील कायदा करण्यासाठी समिती देखील गठित करण्यात आली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक हे या समितीचे अध्यक्ष आहेत.