मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी त्यांच्यावर खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून आरोप करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला होता. त्याचवेळी अदित्य ठाकरेंवरही असाच खोटा आरोप करण्यास मला सांगण्यात आले होते. फडणवीस यांच्यावतीने समीत कदम नावाचा माणूस मला त्यावेळी भेटायला येत असे. आज त्याला काहीही कारण नसताना फडणवीसांनी वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. तो साधा नगरसेवकही नाही असा सनसनाटी आरोप राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.
आज येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी सविस्तरपणे या विषयावर भाष्य केले आहे. देशमुख यांनी म्हटले आहे की, मी गृहमंत्री असतानाच माझ्यावर दबाव आणून उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला होता. फडणवीसांच्या सांगण्यावरून मी जर तसा आरोप केला असता तर उद्धव ठाकरे आणि अदित्य ठाकरे तुरूंगात गेले असते. पण अनिल देशमुख कोणावरही खोटा आरोप करणार नाही, असे मी त्यांना निक्षुन सांगितल्याने फडणवीसांचा प्रयत्न फसला. त्यानंतर आपल्यावरच मुंबईच्या पोलिस आयुक्तांमार्फत खोटा आरोप करून मला तुरूंगात पाठवण्यात आले. असाच प्रयोग त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर केला तो प्रयोग यशस्वी झाला असेही अनिल देशमुख म्हणाले.
उद्धव ठाकरे, अदित्य ठाकरे अजित पवार आणि पार्थ पवार यांच्यावर असा खोटा आरोप करण्यासाठी आपल्यावर जो दबाव आणला त्याला आपण दाद दिली नाही. राजकारणासाठी राजकीय नेत्यांच्या मुलांवरही खोटे आरोप करून त्यांना तुरूंगात टाकण्याचे घाणेरडे राजकारण आपण कधीही करणार नाही. समीत कदम आपल्या घरी आल्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंगही आपल्याकडे असल्याचे देशमुख म्हणाले. त्याला प्रत्युत्तर देताना फडणवीस यांनीही आपल्याकडे फोन रेकॉर्डिंग असल्याचे म्हटले आहे. त्यावर अनिल देशमुख म्हणाले की, बात निकलेगी तो बहुत दूर तक जायेगी. हळूहळू सर्व बाबी मी पुराव्यानिशी उघड करीन. मी कोणालाही घाबरत नाही असेही ते म्हणाले. माझ्यावर फडणवीसांनी केलेला प्रयोग फसल्यानंतर त्यांनी असाच प्रयोग एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यावर केला तो मात्र यशस्वी झाला असे देशमुख यांनी नमूद केले.
फडणवीसांचा नेमका डाव काय होता?
फडणवीसांचा नेमका काय डाव होता याची माहिती देताना अनिल देशमुख म्हणाले की गृहमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे यांनी मला भेटायला बोलावले व मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आम्हाला पैसा कमी पडत असल्याने तीनशे कोटी रूपये जमवून द्यायला उद्धव ठाकरे यांनी आपल्याला सांगितले असे मी प्रतिज्ञापत्राद्वारे सांगावे असे फडणवीसांचे म्हणणे होते. या कामासाठी समीत कदम नावाचा सांगली भागातील एक माणूस मला भेटायला पाठवण्यात आला होता. त्यानेच मला बंद पाकिटात त्या प्रतिज्ञापत्राचा मजकूर लिहून दिला व खुद्द फडणवीस यांच्याशी माझे त्याच्या फोन वरून पाच-सहा वेळा बोलणे करून दिले होते अशी माहितीही देशमुख यांनी दिली. अदित्य ठाकरेवर दिशा सलियन प्रकरणात खोटे आरोप करण्यासही मला सांगण्यात आले हेाते, त्या आधारावर अदित्य ठाकरे यांनाही तुरूंगात पाठवण्याचा फडणवीस यांचा डाव होता असा आरोप अनिल देशमुखांनी केला आहे.