“फडणवीसांच्या कथित पारदर्शकतेचा पर्दाफाश’ 

कराड – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याबाबत खटला चालवण्यास सर्वोच्च न्यायालयाने संमती दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा खोटारडेपणा उघड झाला असून त्यांच्या कथित पारदर्शकतेचा पर्दाफाश झाल्याची टीका माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. मी कराड दक्षिणमधून विधानसभा निवडणूक लढवावी, असा निर्णय कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आ. चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्र्यांचा खोटेपणा उघड झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता फडणवीस यांना राजधर्म पाळण्याची सूचना करतील, अशी अपेक्षा आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी ही विधानसभा निवडणूक पोटापाण्याच्या प्रश्‍नावर लढणार आहे. महाराष्ट्रापुढे आर्थिक मंदी, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, असे अनेक प्रश्‍न उभे असताना भाजप-शिवसेनेकडून भावनिक मुद्दे उपस्थित करुन मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न केला जात आहे; परंतु आम्ही ते यशस्वी होऊ देणार नाही. भाजपने आज जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश नाही. त्यामुळे आमच्या आरोपांमध्ये तथ्य होते, हे सिद्ध झाले आहे.

भाजप-शिवसेनेने अनेक आमिषे दाखवत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना आपल्याकडे ओढले आहे; परंतु त्यांना लवकरच आपल्या निर्णयाचा पश्‍चाताप होईल. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील बहुजन वंचित आघाडीमुळे केवळ भाजपविरोधी मतांचे विभाजन होत आहे. वंचितमुळेच लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचे आठ खासदार महाराष्ट्रातून निवडून गेले आहेत. त्यामुळे आपण जातीयवादी शक्तींच्या विरोधात लढत असल्याचा आंबेडकरांचा दावाही खोटा असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. मला सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या उमेदवारीसाठी आग्रह केला होता. मात्र, परवा झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीने वरिष्ठ पातळीवर चर्चा करून मी कराड दक्षिणमधून विधानसभा निवडणूक लढवावी, असा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)