अबाऊट टर्न: फड

हिमांशू

थांबा… एवढ्यात कंटाळून कसं चालेल? आत्ताशी कुठं पहिलवान आणि नटरंग वगैरे येऊन गेलेत प्रचारात. खरं तर नटरंग या व्यक्‍तिविशेषाची माणूस म्हणून आणि कलावंत म्हणून असलेली किंमत, याच नावाचा शुद्ध मराठी चित्रपट पाहून तरी आपल्याला समजायला हवी होती. परंतु आजही तो थट्टेचा विषय बनतोय, हे त्याचं दुर्दैव! पहिलवानांची तर महाराष्ट्राला मोठी परंपरा. परंतु राजकीय आखाड्यालाच कुस्तीचा आखाडा मानायचं कुणी ठरवलंच असेल, तर पहिलवानाचा उल्लेख जाहीर सभांमधून येणं अपरिहार्य आहे.

हीच मंडळी पहिलवानांची आणि लाल मातीतल्या कुस्तीची मराठमोळी परंपरा जपण्यासाठी काय करतात? याचं उत्तर कुणाकडेच नाही. एकानं दुसऱ्याची निष्क्रियता काढायची आणि दुसऱ्यानं पहिल्याचं राजकीय नपुंसकत्व काढायचं, पण ही संस्कृती ना कुस्तीच्या फडात आहे ना तमाशाच्या फडात! महाराष्ट्राची समृद्ध परंपरा जपणारे हे दोन्ही फड अत्यंत प्रेक्षणीय असतात. कुस्तीचं मैदान पाहणारे शौकीन आपण स्वतःच कुस्ती खेळतोय, असं समजून लढतीत तल्लीन झालेले दिसतात. तसे राजकीय लढतीत तल्लीन होणारे कुणी आहेत का? शोध घ्या!

तमाशाचा उल्लेख प्रचारात आलाच आहे तर त्यातलंच एक पारंपरिक उदाहरण घेऊया. गण झाल्यावर गवळण होते. एका रांगेत चालत गवळणी मंचावर येतात. त्यांचं नेतृत्व “मावशी’ करते. कृष्ण आणि पेंद्या या गवळणींना अडवतात आणि कुणी काय आणलंय विचारतात. गवळणी दूध, दही, तूप, ताक, लोणी अशी उत्तरं देतात आणि मग किसनदेव आणि पेंद्या त्यांना आपला “वाटा’ मागतात. वाटा दिल्याशिवाय वाट सोडायची नाही, हा त्यांचा शिरस्ता! यावेळी जो संवाद मंचावर घडतो, त्यात ही कलावंत मंडळी ताजे संदर्भ आणतात. या संवादातला “मावशी’चा हजरजबाबीपणा आणि समयसूचकता या गोष्टी सर्वांनी एकदा पाहायलाच हव्यात.

अनेकदा या संवादांमध्ये राजकीय संदर्भही येतात. ते ऐकल्यास या मंडळींना राजकारण आपल्यापेक्षा किती अचूक समजतं, हे कळू शकेल. तात्पुरते स्थानिक संदर्भ जमा करून उणी-धुणी काढायला हे काही नेते नव्हेत. चपखलपणे ज्याचं माप त्याच्या पदरात घालणारे अस्सल कलावंत आहेत. आपण या आपल्याच कलावंतांचा कधी अभिमान बाळगला नाही. उलट त्यांना थट्टेचा विषय बनवलं. आजकाल पडदा गाजवणारे सेलिब्रिटीसुद्धा कुणा-कुणाच्या प्रचारासाठी राजकीय फडात उतरतात. कलावंतांची “फेसव्हॅल्यू’ वापरणारे नेते अस्सल कलावंतांची मात्र यथेच्छ टिंगल करतात.

आता प्राण्यांच्या विश्‍वातसुद्धा चर्चा सुरू झाली असेल. कुठल्या प्राण्याची उपमा कुठल्या नेत्याला दिली जाते, याची खुद्द प्राणीही कुतूहलाने वाट पाहात असतील. एकतर आपण या पृथ्वीतलावरचे अनेक जीव कायमस्वरूपी नाहिसे केले; करतो आहोत. त्यांची आश्रयस्थानं उद्‌ध्वस्त करून “विकास’ करतो आहोत आणि निवडणुकीतल्या पार्ट्यांसाठी आपल्याला पुन्हा प्राण्यांचाच जीव घ्यावा लागतोय. असो, नेत्यांच्या शौर्याचं वर्णन करण्यासाठी काही प्राण्यांची नावं आजही आदरानं घेतली जातायत, हेही नसे थोडके!

Leave A Reply

Your email address will not be published.