मुंगेली – छत्तीसगडमधील मुंगेली येथे स्मेल्टिंग प्लांटची चिमणी कोसळल्याने 25 कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची घटना घडली आहे. दरम्यान, या दुर्घटनेत आत्तापर्यंत 9 कामगारांचा मृत्यू झाला आहे तर ढिगाऱ्याखालून दोन मजुरांना बाहेर काढण्यात आले असून जखमी मजुरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंगेलीचे जिल्हाधिकारी राहुल देव याबाबत बोलताना म्हणाले, मुंगेली जिल्ह्यातील सरगाव येथील लोखंड बनवणाऱ्या कारखान्यातील सायलो स्ट्रक्चर कोसळल्याने कामगार अडकण्याची शक्यता आहे. पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.
मुंगेलीचे एसपी भोजराम पटेल म्हणाले, आम्हाला माहिती मिळाली होती की स्मेल्टिंग प्लांटमधील चिमणी आणि सायलोचा काही भाग कोसळला आहे आणि काही कामगार त्याखाली अडकले आहेत. जवळपास सर्वच विभागांचे कर्मचारी येथे आहेत. येथे 3-4 लोक अडकले असण्याची शक्यता आहे. ढिगारा काढून टाकल्यानंतर परिस्थिती स्पष्ट होईल.
दोन जखमींना उपचारासाठी बिलासपूर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मदत कार्य चालू आहे. घटनास्थळी तातडीने पोलीस आणि रेस्क्यू टीम पोहोचली असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. ही दुर्घटना सरगाव येथील रामबोड या भागात घडली आहे. प्रशासन स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे. ही दुर्घटना लोखंडी पाइप बनवण्याच्या कारखान्याचे बांधकाम सुरू असताना घडली आहे.