नवी दिल्ली – मोदी सरकार देशातील बेरोजगार तरूणांना महिन्याला 3800 रूपये भत्ता देत आहे, अशी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोबतच एक लिंकही पाठवली जात आहे. ज्यात योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज करण्यास सांगितले जात आहे. मात्र, सरकारकडून ही बातमी खोटी असल्याचे सांगण्यात आले आहे. सरकारकडून अधिकृतपणे अशी कोणतीही घोषणा केली नसल्याचे सांगण्यात आले आहे.
काय लिहिलंय व्हायरल पोस्टमध्ये ?
व्हायरल पोस्टमध्ये लिहिण्यात आले आहे की, या योजनेंतर्गत तुमचे रजिस्ट्रेशन करा. सरकारच्या योजनेनुसार तरूण बेरोजगारांना 3800 रूपये प्रति महिना भत्ता देण्यात येईल. अर्ज निशुल्क असून 18 ते 50 वर्ष वयोगटातील व्यक्ती यासाठी अर्ज करू शकतात. रजिस्ट्रेशनसाठी http://bit.ly/pradhanmantrI-berojgar-bhatta-yojnaa या लिंकवर क्लिक करण्यास सांगितले गेले आहे. या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो देखील आहे.
जाणून घ्या काय आहे सत्य –
पंतप्रधान बेरोजगार योजनेची लिंक https://www.hubbyhubby.life/ नावाच्या वेबसाईटची लपवलेली लिंक आहे. साधारणपणे मुळ वेबसाइट लपवण्यासाठी किंवा लिंक छोटी करण्यासाठी बिटली नावाचा वापर केला जातो. या पोस्टमधील लिंकमध्ये पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजनेच्या नावाचा वापर केला आहे. सत्यता पडताळणीत ही पोस्ट स्पष्टपणे खोटी असल्याचे समोर आले आहे.
तुमची वयक्तिक माहिती धोक्यात येऊ शकते –
अनेकवेळा काही कंपन्या आपल्या वेबसाइटवर रिव्हेन्यु जनरेट करण्यासाठी अशा शकली लढवत असतात. जेवढे जास्त लोक लिंक वर क्लिक करून वेबसाइटवर येतील आणि तेथील जाहीराती त्यांना दिसतील त्यानुसार त्यांना पैसे मिळत असतात. तसेच काही कंपन्या तुमची माहिती मागवून तुमचा मोबाइल नंबर, इमेल आयडी ही सर्व माहिती बिजनेस प्रमोशन करणाऱ्या कंपन्यांना विकत असतात. त्यामुळे तुमची माहिती धोक्यात येऊ शकते. अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याआधी सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर एकवेळा माहिती पडताळून घ्यावी.
अशा फसवणूकीपासून कसा बजाव कराल?
सायबर तज्ज्ञ सांगतात की, कोणतेही url हे http:// ने सुरू होते ते असुरक्षित असते. यावर क्लिक केल्याने तुमच्या मोबाइलवरील, सिस्टमवरील माहिती लिक होऊ शकते. त्यामुळे जी वेबसाईट https:// ने सुरू होते ती सुरक्षित असते. जर कोणत्याही बॅंक, वित्तीय संस्था यांकडून मेलच्या माध्यमातून काही लिंक पाठवल्या असतील तर त्यावर क्लिक करू नये. संबंधीत बॅंकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊनच तेथून माहिती घ्यावी.