वाघोलीतील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी सोयीसुविधा पुरवाव्यात

जिल्हाधिकारी कार्यालयाचे जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीला पत्र

वाघोली – वाघोली येथील गट नंबर १४१९ मधील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी संरक्षक भिंत, पाणीपुरवठा, शेड आदी सोयीसुविधा पुरविण्यासंदर्भात आमदार अशोक पवार यांच्यामाध्यमातून नागरिकांनी मागणी केली असता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीला सोयीसुविधा पुरविण्यासंदर्भात पत्र काढण्यात आले आहे. वाघोली ग्रामपंचायतीने सुविधा पुरविण्यासाठी सकारात्मकता दर्शविली  असल्याचे सरपंच वसुंधरा उबाळे यांनी सांगितले.  यावेळी आमदार पवार यांचा सत्कार लिंगायत समाज व नागरिकांच्या वतीने करण्यात आला.

लिंगायत समाजाला अंत्यविधी करण्यासाठी २००८ मध्ये ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार गट नंबर १४१९ मधील स्वतंत्र २० गुंठे जागा देण्यात आली होती. सुरुवातीच्या काळामध्ये याठिकाणी काहींचे अंत्यसंस्कार करण्यात आले मात्र कालांतराने त्याठिकाणी कचरा व इतर अडचणींमुळे अंत्यसंस्कार होण्याचे बंद झाले. वाघोलीतील लिंगायत समाजाच्या मृत नागरिकाचे अंत्यसंस्कार वडगावशेरी भागामध्ये होत आहे. वाघोली येथे अंत्यविधीसाठी देण्यात आलेल्या जागेची सुधारणा होऊन सोयी सुविधा मिळण्यासाठी आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नागरिकांनी मागणी केली होती.

आमदार अशोक  पवार यांनी पाठपुरावा केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सदर जागेमध्ये सोयीसुविधा पुरविण्यासाठी पत्र काढण्यात आले. वाघोलीतील लिंगायत समाज स्मशानभूमीच्या जागेतील सपाटीकरण व आवश्यक सोयीसुविधा लवकरात लवकर देण्यात येणार आहे. शिवदास उबाळे, माजी सरपंच, ग्रामपंचायत वाघोली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.