प्रभात वृत्तसेवा-पुणे, दि. 3 -नोकरीनिमित्त शहरांमध्ये राहणारे चाकरमानी गणेशोत्सवाला कोकणात आपल्या गावाकडे जातात. या गणेशभक्तांना आपल्या गावी जाता यावे, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून दरवर्षी गणेशोत्सवकाळात मुंबई, पुण्यातून गणपती विशेष रेल्वे चालवल्या जातात.
यावर्षीदेखील मध्य रेल्वेकडून 21 ऑगस्ट ते 11 सप्टेंबरदरम्यान विविध मार्गांवर 74 विशेष रेल्वे चालवण्याचे नियोजन केले आहे. तर पुण्यातून सहा विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. तसेच प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे फेऱ्याही वाढवल्या जाण्याची शक्यता आहे. सर्व गाड्यांचे आरक्षण सोमवारपासून (दि. 4 जुलै) सुरू होणार असून प्रवाशांनी प्रवासी आरक्षण केंद्र तसेच आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर करता येईल.
पुणे स्थानकातून सुटणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक : गाडी नं. 01141 पुणे-कुडाळ रेल्वे दिनांक 23, 30 ऑगस्ट आणि 6 सप्टेंबर रोजी पुणे स्थानकातून रात्री 12 वाजून 30 मिनिटांनी सुटेल. तर गाडी न.ं 01145 पुणे-थिवी/कुडाळ रेल्वे 26 ऑगस्ट आणि 2, 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजून 30 मिनटांनी सुटेल.
कुडाळ स्थानकातून सुटणाऱ्या गाड्याचे वेळापत्रक : गाडी नं. 01142 कुडाळ-पुणे रेल्वे दिनांक 23, 30 ऑगस्ट आणि 6 सप्टेंबर रोजी कुडाळ स्थानकातून दूपारी 3 वाजून 30 मिनटांनी सुटेल. तर गाडी नं 01146 थिवी/कुडाळ-पुणे रेल्वे 28 ऑगस्ट आणि 4, 11 सप्टेंबर रोजी कुडाळ स्थानकातून दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुटेल.