फेसबुकवरील मित्राने तरुणीला 80 हजारांना घातला गंडा

वाढदिवसाची किमती भेटवस्तू देण्याचे दाखविले आमिष

पुणे – फेसबुकच्या माध्यमातून अनोळखी युवकासोबत मैत्री करणे एका उच्चशिक्षित तरूणीस चांगलेच महागात पडले आहे. फेसबुकवरील मित्राने सदर तरूणीला वाढदिवसाची भेटवस्तू पाठविण्याच्या बहाण्याने 80 हजार रूपये बॅंक खात्यात जमा करायला लावून तिची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याप्रकरणी वानवडी येथील 26 वर्षीय तरूणीने तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात तीन व्यक्‍तींविरोधात आयटी अॅक्‍टअंतर्गत वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरूणी ही संगणक अभियंता असून ती पुण्यातील एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करते. फेसबुकवर तिचे खाते आहे. मागीलवर्षी फेब्रुवारी 2017 मध्ये तिला एका युवकाने फ्रेंड रिक्‍वेस्ट पाठविली होती. तिने रिक्‍वेस्ट स्वीकारली. त्यानंतर आरोपीने तिच्याशी मैत्री वाढवून मोबाईल क्रमांक मिळवला. यानंतर तिला कॉल करून वारंवार संवाद साधला. दरम्यान फिर्यादी तरूणीचा वाढदिवस असल्याने आरोपीने वाढदिवसाची किंमती भेटवस्तू पार्सलद्वारे पाठविणार असल्याचे आमिष दाखविले.

आरोपीने पाठविलेले पार्सल मिळवण्यासाठी फिर्यादीने आरोपीच्या विविध बॅंक खात्यांमध्ये 80 हजार रूपयांची रक्‍कम जमा केली. मात्र, आरोपीने तिला कोणतीही भेटवस्तू पाठविली नाही. तसेच पैसे जमा झाल्यावर तिच्याशी संपर्क करणेही सोडून दिले. फिर्यादीस फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने वानवडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात आरोपीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, सोशल मिडियाच्या अभासी जगातील व्यक्तींकडून फसवणूक होण्याची दाट शक्‍यता आहे. नायजेरियन आरोपी विवाहविषयक संकेतस्थळ तसेच सोशल मीडियावर बनावट खाते तयार करून त्याद्वारे संपर्क साधून फसवणूक केल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. नागरिकांनी समोरील व्यक्तींची खातरजमा करूनच त्याच्यासोबत आर्थिक व्यवहार केला पाहिजे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)