फेसबुकवर झालेल्या मैत्रीद्वारे पुण्यातील तरूणीला ‘इतक्या’ लाखांचा गंडा

अमेरिकेतून गिफ्ट पाठविल्याच्या बहाण्याने तरूणीला ट्रान्सफर करायला लावले पैसे 

पुणे – सुरूवातील फेसबुकवर मैत्री झाली. त्यानंतर मी अमेरिकेत आहे. संगीतकार आहे. लवकरच भारतात येणार असल्याची बतावणी करून पाठविलेले गिफ्ट सोडवून घेण्यासाठी खात्यामध्ये 11 लाख 59 हजार 500 रुपये ट्रान्सफर करायला भाग पाडून तरूणीची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वानवडी पोलिसांनी अज्ञात मोबाईलधारक आणि खातेधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत वानवडी भागात राहणाऱ्या 27 वर्षीय तरूणीने फिर्याद दिली आहे. 11 ते 28 मार्च 2019 या कालावधीत ही घटना घडली. फिर्यादीशी फेसबुकवरून मैत्री केली. तु सुंदर आहे. माझे तुझ्यावर प्रेम आहे. लवकरच भारतात येऊन लग्न करणार असल्याची बतावणी तिला केली. त्यानंतर गिफ्ट पाठविले आहे. ते स्वीकार, असे सांगितेले. त्यानंतर फिर्यादीच्या मोबाइल फोन आला. तुमचे गिफ्ट आले आहे. ते सोडविण्यासाठी 35 हजार रुपये कस्टम चार्जेस म्हणून भरावे लागतील, असे सांगितले. फिर्यादींनी त्यानुसार पैसे ट्रान्सफर केले.

त्यानंतर पुन्हा फोन आला. परदेशातून आलेल्या पाकिटामध्ये डॉलर आहेत. भारतीय चलनानुसार ती मोठी रक्कम बनते. त्यामुळे चलन बदलण्याचे चार्जेस आणि विमा क्‍लेमचे चार्जेस म्हणून त्यांना वेळोवेळी पैसे भरण्यास भाग पाडले. त्यानंतर फिर्यादींना कोणतेही गिफ्ट मिळाले नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसात धाव घेतली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस अधिक तपास करत आहेत. ते म्हणाले, शिकलेल्या व्यक्तींकडून अशा प्रकारचे गुन्हे करण्यात येत आहे. मात्र, तरूण-तरूणींनी अशा गुन्हापासून सावध राहिले पाहिजे. जे शक्‍य नाही, त्यासाठी विनाकारण पैसे भरून फसवणूक करून घेऊ नये.

Leave A Reply

Your email address will not be published.