यान्गोन – लष्कराने केलेल्या उठावाला जगभरातून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभुमीवर म्यानमारमधील नवीन लष्करी शासनाने फेसबुकचा वापर रोखला आहे. लष्कराने बंड करून सनदशीर मार्गाने निवडून आलेल्या आंग सान स्यू की यांचे सरकारला बरखास्त केल्याच्या विरोधात लष्करी शासनाच्याविरोधात फेसबुकवर असहकाराचे आवाहन केले जात असल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
म्यानमारमध्ये फेसबुक विशेष लोकप्रिय आहे. लष्करी शासनाच्यावतीनेही कोणतीही घोषणा फेसबुकवरच्या पोस्टमधूनच केली जात असते. फेसबुक बंद करण्यामुळे म्यानमारमधील नागरिकांमध्ये कमालिची अस्वस्थता निर्माण झाली आहे. बुधवारी रात्रीपासून फेसबुकचा वापर बंद करण्यात आला.
म्यानमारमधील इंटरनेट सर्व्हिस पुरवणाऱ्या तालेनोर म्यानमारने एक निवेदन प्रसिद्ध करून याबाबतची फेसबुकला तात्पुरते स्थगित करण्याचे आदेश प्रसारण मंत्रालयाकडून मिळाले असल्याचे म्हटले आहे. हे आदेश मानवी हक्कांचे उल्लंघन करणारे असल्याचे कंपनीने मान्य केले आहे. मात्र तरिही या आदेशांची अंमलबजावणी केली जाणार असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
दोन दिवसांपासून लष्करी हुकुमशाहीचा निषेध करण्यासाठी नागरिकांनी ठिकठिकाणी क्रांती गीते गायली. त्याचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल व्हायला सुरुवात झाली आहे. स्यू की यांना अटक केल्यानंतर त्यांच्यावर आयात-निर्यात कायद्याचा भंग केल्याचा आरोप ठेवून 14 दिवसांच्या कोठडीत रवाना करण्यात आले आहे. या आरोपात दोषी ठरवल्यावर स्यू की यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शक्यता आहे.