मधुमेहींचे नेत्र विकार

मधुमेह म्हणजे आपल्या रक्‍तातील साखरेचे प्रमाण अपेक्षेपेक्षा जास्ती असणे. आपल्या शरिरातील हिमोग्लोबीन, रक्‍तातील साखर, आपला रक्‍तदाब जर नियंत्रित असेल तर सहसा आजार होण्याचे प्रमाण कमी असते. पण सध्या आपली अनैसर्गिक जीवनशैली यामुळे उच्च रक्‍तदाब, मधुमेह इत्यादींचे प्रमाण वाढले आहे. मला आठवतंय, आम्ही शिकत असतांना साधारण साठीच्या वयाच्या पुढच्या रूग्णांना आम्ही मधुमेह किंवा उच्च रक्‍तदाब वगैरे आजार आहे का? असे विचारित असे परंतु आता साधारण तिशीच्या हा प्रश्‍न आम्ही विचारीत असतो.

आपल्या शरिरातील कौशिकाना प्राणवायू व ग्लुकोजचा पुरवठा करण्याचे काम हिमोग्लोबीनद्वारे शरिरातील इन्सुलिन नावाचे हार्मोन करीत असते व आपल्या शरिराचे काम व्यवस्थित चालते. जर साखरेचे प्रमाण वाढले तर इन्सुलिन ते काम योग्य प्रकारे करू शकत नाही व कोशिकांना ग्लुकोज व प्राणवायुचा पुरवठा होऊ शकत नाही. त्याची पुर्ती करण्याकरिता नवीन रक्‍तवाहिन्यांची निर्मिती होते पण या रक्‍तवाहिन्या कमकुवत असतात व पटकन्‌ फुटू शकतात व त्यामुळे रक्‍तस्त्राव होतो. ही प्रक्रिया संपूर्ण शरिरांमध्ये होत असते. उदा. मेंदू, किडनी व डोळ्याचा पडदा इत्यादी.

डोळ्याला मेंदूची खिडकी म्हणतात कारण या रक्‍तवाहिन्या डॉक्‍टर प्रत्यक्ष बघू शकतात त्याकरिता डोळ्यातील बाहुल्या औषध घालून मोठ्या केल्या जातात व आतील पडदा तपासला जातो. दुष्पपरिणाम डोळ्याच्या पडद्यावरील रक्‍त वाहिन्यात दिसून येतात तसेच दुष्पपरिणाम मेंदू व किडनीमधील रक्‍तवाहिन्यातही होत असतात. म्हणून जर असे दोष डोळ्यांत आढळले तर डॉक्‍टराच्या सल्ल्यानुसार इतर तपासण्यापण करून घ्यावा.

मधुमेहामुळे डोळ्यांच्या बाहुलीवर, डोळ्यातील भिंगावर, पडद्यावर, परिणाम दिसून येतात त्यामुळे डोळे लाल होणे, डोळ्याचा दाब वाढणे (काचबिंदू) मोतीबिंदू, डोळ्याच्या आतील जेलीत रक्‍तस्त्राव होणे (विट्रयम हेमेरेज), वारंवार चष्म्याचा न बदलणे, हे सर्व दुष्पपरिणाम आपण टाळू शकतो व त्यावर योग्य ते उपचार करून अंधत्व टाळू शकतो. त्यामुळे ज्यांच्या आई वडिलांना मधुमेह आहे किंवा होता अशा तिशीच्या पुढच्या सर्व लोकांनी रक्‍तातील साखरेची तपासणी करून घेणे. (मधुमेह अनुवांशिक असण्याचे प्रमाण जास्ती आहे. आपल्याला बीज जरी आई वडिलांकडून मिळाले तरी त्यांचा वृक्ष न होऊ देणे हे आपल्या हातात आहे.) ज्यांना मधुमेह आहे तरी त्यांनी दरवर्षी डोळे तपासून घेणे व त्यावर डॉक्‍टरांनी सांगितल्याप्रमाणे उपचार करून घेणे आवश्‍यक.

मधुमेहामुळे होणारे दुष्परिणाम हे मधुमेहाचे वय किती आहे? यावर अवलंबून असते. समजा एखाद्या व्यक्‍तीचे वय 50 वर्ष आहे व त्याला वयाच्या 40 व्या वर्षी मधुमेह झाला असेल तर त्याचे मधुमेही वय 10 वर्ष असते. जेवढी मधुमेही वय जास्त तेवढे दुष्परिणाम जास्त. जर मधुमेह आटोक्‍यात ठेवला तर दुष्परिणाम होण्याची शक्‍यता कमी.
-डॉ. आभा कानडे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)