लक्षवेधी : गेहलोतांचे “राजपूत कार्ड’

– नितीन चौधरी
चालू वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजस्थानातील राजकारण तेथील वाळवंटाच्या रेतीप्रमाणेच तापले आहे. गेहलोत यांनी राजस्थानच्या राजकारणात आणि समाजकारणात प्रभावशाली घटक असणाऱ्या राजपूत समाजातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी “महाराणा कार्ड’ खेळले आहे.
राजस्थानमध्ये यावर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होत आहेत. या राज्यातील राजकारणाचा लोलक हा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याभोवतीच फिरताना दिसत आहे. भाजप आणि कॉंग्रेस पक्षाकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. कॉंग्रेसचा विचार केला तर कॉंग्रेस नेते सचिन पायलट यांच्याकडून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना राजकीय आव्हान मिळत आहे. या आव्हानांचा मुकाबला करताना गेहलोत यांची पळापळ होत असताना ते विरोधकांना मागे ढकलण्यासाठी सातत्याने राजकीय डावपेच आखत आहेत. यादृष्टीने गेहलोत यांनी राजस्थानच्या राजकारणात, समाजकारणात प्रभावशाली घटक असणाऱ्या राजपूत समाजातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी “राजपूत कार्ड’ खेळले आहे.
चितोडचे महाराणा प्रताप हे 16 व्या शतकातील राजस्थानचे महान योद्धे. त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे नेहमीच ऐकावयास मिळतात आणि त्यांचे शौर्य जनतेच्या मनावर कोरले गेलेले आहे. राजकीयदृष्ट्या मेवाड हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. या बालेकिल्ल्यात राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्याचा कॉंग्रेसकडून प्रयत्न केला जात आहे. राजस्थानातील भाजपचे नेते गुलाबचंद कटारिया यांना आसामचे राज्यपाल म्हणून नियुक्त केल्यानंतर त्यांची जागा भरून काढण्यासाठी भाजपला बरेच प्रयत्न करावे लागणार आहे. कॉंग्रेस याच गोष्टींचा लाभ घेऊ इच्छित आहे. गेल्या काही वर्षांत महाराणा प्रताप यांच्या इतिहासावरून भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात संघर्ष पाहावयास मिळाला. त्यापार्श्वभूमीवर अशोक गेहलोत यांनी वीर शिरोमणी महाराणा प्रताप मंडळाची घोषणा केली. या माध्यमातून राज्यातील तरुणांना महाराणा प्रताप यांच्या शौर्याची माहिती दिली जाणार आहे.
राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांकडून जारी केलेल्या निवेदनात म्हटले, की वीर शिरोमणी महाराणा प्रताप मंडळाच्या माध्यमातून राज्यातील तरुण पिढीला महाराणा प्रताप यांच्या शौयाची माहिती दिली जाणार आहे. हे मंडळ अभ्यासक्रमाचा मजकूर, इतिहास संरक्षण, नवनिर्मिती, विविध भाषेवरचे संशोधन, प्रकाशनाचा प्रचार, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार, व्याख्याने, कविसंमेलने आदींसाठी एक योजना तयार करेल. राजपूत समाजाची संस्था मेवाड क्षत्रिय महासभातर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना गेहलोत यांनी महाराणा प्रताप मंडळाची माहिती दिली. ते म्हणाले की, आगामी पिढ्यांच्या हाती इतिहासाच्या रूपातून या वीराची गौरवशाली गाथा सोपवणे सध्याच्या पिढीचे कर्तव्य आहे. एकीकडे गेहलोत कार्यक्रमात बोलत असताना दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. पी. जोशी देखील अशाच प्रकारच्या समाज कार्यक्रमात सहभागी झाले होते. यादरम्यान, त्यांनी अशोक गेहलोत यांच्यावर टीका केली.
मेवाड हा भाजपचा गड
मेवाड भाजपचा गड राहिलेला आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने विधानसभेत विजय मिळवला असला तरी कॉंग्रेसला उदयपूर जिल्ह्यात 8 पैकी केवळ दोनच जागा मिळाल्या. अन्य जागांवर भाजपचा दबदबा राहिला आहे. राज्यात राजपूत समाजाची संख्या 11 ते 12 टक्के आहे. यावरून मेवाड प्रांत आणि राज्यातील अन्य भागात राजपूत समाजाची राजकीय शक्ती लक्षात घेता येऊ शकेल. 2018 मध्ये कॉंग्रेसला मेवाड वगळता सर्वच ठिकाणी चांगले यश मिळाले. त्यावेळी क्षत्रिय समाज हा वसुंधराराजे यांच्यावर तीव्र नाराज होता. कुख्यात गुंड आनंदपालचा चकमकीत खात्मा होणे, जसवंत सिंह यांना बाजूला टाकणे, निदर्शने करणाऱ्या राजपूत आंदोलकांवर गुन्हे दाखल होणे या कारणांचा फटका भाजपला बसला.
गेल्या दशकांत राजस्थानाच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात बरेच बदल झाल्याचे दिसून आले. कॉंग्रेसच्या अगोदर भाजप सरकारने शाळेतील पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासक्रमात बदल केला. यानुसार महाराणा प्रताप यांनी हळदीघाटीच्या युद्धात अकबराला हरवल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर अकबर यांच्या नावासमोर महान हा शब्द काढून टाकण्यात आला. मात्र, 2018 मध्ये कॉंग्रेसचे सरकार स्थापन झाल्यानंतर एक समिती नेमण्यात आली. यात इतिहासाच्या पुस्तकातील बदलावर आढावा घेण्यात आला. या आढाव्यानंतर केलेल्या बदलाने पुन्हा एकदा वाद निर्माण झाला. हा बदल हळदीघाटीवरील युद्धावरून होता. नव्या पुस्तकात युद्धाचा शेवट सांगितलेला नाही. कालांतराने अकबर यांच्या विरुद्ध महाराणा प्रताप हे गनिमीकाव्याने युद्ध करत राहिले, असे म्हटले आहे. या बदलामुळे भाजपने कॉंग्रेसवर आरोप केला आहे. तर कॉंग्रेसने भाजपवर महाराणा प्रताप यांच्या नावावर राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.





