भारतातील १२ वर्षाहून कमी वयाच्या मुलांमध्ये डोळ्यांच्या आजारांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले असून ही धोक्याची घंटा आहे. भारतातील तरुण मुले १४ तास घरातील अनैसर्गिक दिव्यांच्या प्रकाशात आणि विविध स्क्रीनच्या समोर बसूनच घालवतात. मुलांमधील आरोग्याच्या या चिंतेसाठी त्यांच्या पालकांचे दुर्लक्ष आणि निष्काळजीपणाच कारणीभूत आहे. त्यांच्यापैकी केवळ ४६ टक्के पालक त्यांच्या मुलांचे डोळे नियमितपणे तपासून घेतात. मुले दिवसातील निम्म्याहून अधिक काळ घरात व्यतीत करत असल्यामुळे घरातील दिव्यांचा चांगला दर्जा असणे ही डोळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची बाब ठरते.
कमी प्रकाश, बराचवेळ स्क्रीनकडे पाहणे आणि हिरव्या पालेभाज्यांचे आहारातील अत्यंत कमी प्रमाण या कारणांमुळे १२ वर्षाहून कमी वयाच्या मुलांच्या दृष्टीवर दुष्परिणाम होत आहे. या वयोगटातील मुलांनी जास्त काळ स्क्रीनकडे पाहिले, तर त्याचा त्यांच्या दृष्टीवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. डोळ्यांच्या आरोग्यात प्रकाश योजना खूप महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच दिव्याचे फ्लिकरिंग, अति प्रखर प्रकाश आणि अयोग्य जागी असलेला दिव्याचा स्रेत यामुळे डोळ्यांवर दीर्घकालीन परिणाम होतो. लक्ष केंद्रित करण्याच्या मुलांच्या क्षमतेमध्ये प्रकाश योजनेचा थेट वाटा असतो.
स्क्रीन पाहण्याची वेळ कमी करणे, पुरेशी झोप आणि प्रथिनयुक्त आहार या साध्या उपायांचा अवलंब करून पालक त्यांच्या पाल्यांच्या दृष्टीचे रक्षण करू शकतात. जसे की वाचनासाठी पांढरा प्रकाश देणारा दिवा आणि विश्रांतीसाठी पिवळा प्रकाश देणारा दिवा. त्याचबरोबर प्रकाशस्त्रोत हा योग्य ठिकाणी बसवणेही अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषत: टीव्ही पाहताना आणि वाचताना ही काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
आपण ज्या पद्धतीचे दिवे वापरतो त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनावर लक्षणीय परिणाम होत असतो आणि विशेषत: मुलांनाच याचा त्रास होऊ शकतो, कारण ते दिवसातील जवळजवळ १४ तास घरातच विविध स्क्रीन्सच्या समोर घालवतात. कमी दृष्टी असलेल्या मुलांची अभ्यासातील प्रगती कमी असते तसेच त्यांची अनुपस्थितीही अधिक असते असे बाल सप्ताहाच्या निमित्ताने करण्यात आलेल्या निरीक्षण अहवालांतून समोर आले आहे. त्यामुळेच पालकांनी त्यांच्या घरासाठी सर्वोत्तम प्रकाश देणारी लायटिंगची उत्पादने निवडावीत, जेणेकरून ग्लेअर किंवा फ्लिकरचे प्रमाण कमी होईल.
ग्लेअर किंवा फ्लिकरमुळे डोळ्यांना असहजता येते आणि डोकेदुखीसारखे त्रास उद्भवतात. खरेतर नेत्रतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ग्राहकांनी स्वस्त किंवा अन्ब्रँडेड दिव्यांपेक्षा त्यांच्या व त्यांच्या मुलांच्या डोळ्यांना सहजता देणा-या बल्बची निवड खरेदी करताना करायला हवी. कारण, स्वस्त दिवे त्यांच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी ते हानिकारक असतात.