जम्मू – काही तरुणांनी चालकाला गोळ्या घालून मोटार पळवल्यानंतर जम्मू पठाणकोट महामार्गावरील सर्व तपासणी नाक्यांना अतिसतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे.
पंजाबच्या पोलीस महासंचालकांनी त्यांच्या राज्यांसह जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये हा आदेश दिला आहे. गुरूदासपूरमध्ये दिनानगर भागात तीन जणांनी एका मोटारचालकाला गोळ्या घालून त्याची मोटार पळवून नेल्यानंतर हा आदेश देण्यात आला.
पंजाब पोलीस महासंचालकांनी या घटनेची माहिती कळवल्यानंतर सर्व तपासणी नाक्यांना सतर्क करण्यात आले आहे. कोणत्याही कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
पंजाबच्या सीमेवरील गस्त वाढवण्यात आली असून रात्रभर जागता पहारा ठेवण्यात आला होता. जर हल्लेखोरांनी काश्मिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना बेड्या ठोकू, असा विश्वास काश्मीरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.