पुणे : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात गेल्या 24 तासात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे धरणसाठा एका रात्रीत दीड टीएमसीने वाढला असून पाणीसाठा शनिवारी सकाळी 16.74 टीएमसी झाला आहे.
गेल्या 24 तासात खडकवासला धरणात 76 मिमी, पानशेत धरणात 147 मिमी, वरसगाव धरणात 145 मिमी तर टेमघर धरणात तब्बल 170 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
शुक्रवार सकाळ पासून या चारही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी रात्री तसेच शनिवारी पहाटे पावसाचा जोर जास्त होता. त्यामुळे पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.