सिडनी – ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स या सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या प्रांतात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आदेश दिले आहेत. ही पूरस्थिती या प्रांतात गेल्या दशकभरापासून सर्वात वाईट आहे, असे प्रशासनाने म्हटले आहे. आपत्कालिन बचाव कार्याला वेग आला असून शनिवारी संपूर्ण प्रांतातून 640 ठिकाणांवरून मदतीचे आवाहन केले आहेत. त्यातील 66 ठिकाणी पूरातून सुखरूप वाचवण्यासाठी केले गेलेले कॉलही होते.
आतापर्यंत शेकडो लोकांना पूराच्या पाण्यापासून वाचविण्यात आले आहे, असे न्यू साउथ वेल्सचे प्रीमियर ग्लेडिस बेरेजिक्लियन म्हणाले. न्यू साऊथ वेल्स प्रांताच्या ईशान्य भागात गेल्या 100 वर्षात झाला नव्हता, तेवढा पाऊस झाला आहे. त्याच बरोबर उत्तर किनारपट्टीच्या मध्य भागातही पूरस्थिती अतिशय गंभार बनली आहे. या भागात आणखीन पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सिडनीच्या वॅरांगम्बा धरण ओसंडून वाहू लागले आहे. आतापर्यंत 13 ठिकाणी पूरग्रस्त नागरिकांसाठी आश्रय छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. स्थानिक प्रशासनाने ठिकठिकाणच्या नागरिकांना घराबाहेर न पडण्याची सूचना केली गेली आहे. महामार्गांवर पूराचे पाणी आल्यामुळे कार वाहून जाण्याची शक्यता असल्याचेही स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे.