पुणे, दि. 18 -राज्यातील 2 कोटी 62 सातबारा उतारे आणि साठ लाख प्रॉपर्टी कार्डना अकरा आकडी भूभाग क्रमांक (यूएलपीआयएन आयडी) देण्यात आला आहे. तसेच युएलपीआयएन क्रमांकावरून सातबारा उतारा अथवा प्रॉपर्टी कार्डची सत्यता तपासणे शक्य होणार आहे. मागील आठवड्यापासून याची अंमलबजावणी सुरू झाली असून, हा प्रकल्प राबविणारे महाराष्ट्र हे देशातील दुसरे राज्य ठरले आहे.
शहरातील व ग्रामीण भागातील जमिनींना भूभाग क्रमांक देण्याची मोहीम केंद्र सरकारने हाती घेतली आहे. या मोहिमेतंर्गत सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड यांना हा भूभाग क्रमांक देण्याचे काम मध्यंतरी हाती घेतले होते. या सर्व सातबारा व प्रॉपर्टी कार्ड यांना हा भूभाग क्रमांक देण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड यांच्या उजव्या कोपऱ्यात हा भूभाग क्रमांक दिला आहे.
या आधी सातबारा उतारा संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेण्यासाठी जिल्हा, गावाचे नाव, सर्व्हे नंबर अथवा गट नंबर टाकल्यानंतरच सातबारा उतारा डाऊनलोड होत होता. आता संकेतस्थळावर फक्त भूभाग क्रमांक टाकल्यास लगेचच सातबारा उतारा डाऊनलोड करता येणार आहे. त्यामुळे नागरिकांना सर्व्हे नंबर लक्षात ठेवण्याऐवजी हा नंबर लक्षात ठेवणे, व त्या नंबरच्या आधारे जमिनी अथवा मिळकतीसंदर्भातील सर्व माहिती मिळणे सहज शक्य होणार आहे. तसेच हा नंबर प्रत्येक सातबारा अथवा प्रॉपर्टी कार्डला स्वतंत्र असणार असून, फेक नंबर ओळखण्याची देखील यामध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राज्यातील सर्व शहरे आणि ग्रामीण भागातील जमिनींना अकरा आकडी भूभाग क्रमांक देण्यात आला आहे. याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. काम पूर्ण झाले आहे. येथून पुढे नागरीकांना सर्व्हे नंबरऐवजी हा नंबर लक्षात ठेऊन जमिनीची माहिती घेणे शक्य होणार आहे..
-निरंजन सुधांशू, जमाबंदी आयुक्त
ठळक वैशिष्ट्ये…
शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक जमिनीला भूभाग क्रमांक
सातबारा आणि प्रॉपर्टी कार्डच्या उजव्या बाजूला क्यूआर कोड आणि नंबर
नंबरावरून अथवा क्यूआर कोडवरून सातबारा अथवा प्रॉपर्टी कार्डची सत्यता तपासता येणार
भूभाग ओळख क्रमाकावरून फेक नंबर लगेच ओळखता येणार
प्रत्येक मिळकतीचा भूआधार क्रमांक स्वतंत्र असणार
हा नंबर अकरा आकडी असणार
सर्व्हे नंबरऐवजी भूभाग क्रमांक येथून पुढे वापरणार