पूर्व हवेलीत पोलिसांवर अतिरिक्‍त ताण

48 गावांचा भार सोसवेना : लोणी काळभोर, लोणीकंद, उरूळी कांचनचे कर्मचारी कामांच्या बोझाखाली

वाघोली – पूर्व हवेलीतील 48 गावांत कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ग्रामीण पोलीस दलाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना अतिरिक्‍त ताण पडत आहे. पुणे शहराजवळ असलेल्या आणि ग्रामीण कूस बदलून शहरी तोंडवळा लाभलेल्या या गावांमध्ये गुन्हेगारीचा आलेख उंचावत आहे. लोणी काळभोर, लोणीकंद, उरूळी कांचन, थेऊर पोलीस चौकीअंतर्गत या गावांचा कारभार हाकला जात असताना गुन्ह्याचे प्रमाण वाढता वाढता वाढे, अशी स्थिती आहे.

पूर्व हवेलीचा समावेश हा सधन आणि बागायती शेतीचा आहे. थेऊरचा यशवंत कारखाना, वाघोली, लोणी काळभोर, उरूळी कांचन, थेऊर, सोरतापवाडी आदी गावे नागरिकीकरणाकडे वाटचाल करीत आहेत. तसेच या परिसरात शैक्षणिक संस्था, सदनिका आदींची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडी आणि दळणवळणाच्या दृष्टीने सोयीच्या ठिकाणी पसंती देत आहेत. त्यामुळे 12 वर्षांत परिसराचा झपाट्याने विकास झाला आहे.

लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत 25 गावे येतात. त्यात 10 गावे ही पुणे महानगरपालिकेत समाविष्ट आहेत. परंतु ही 10 गावे लोणीकंद पोलीस ठाण्याअंतर्गत आहेत. या गावांच्या सुरक्षेची मदार ग्रामीण पोलिसांवर आहेत. त्यामुळे या गावांतील जमिनींच्या व्यवहारातील फसवणूक, गैरव्यवहार, खून, हाणामारी, चोरींच्या घटना घडत आहेत.

66 कर्मचाऱ्यांवर 23 गावांचा कारभार
लोणी काळभोर पोलीस ठाण्याअंतर्गत उरुळी कांचन, उरुळी देवाची व थेऊर अशा तीन चौक्‍या आहेत. या पोलीस ठाण्यात 2 पोलीस निरीक्षक, 4 सहायक पोलीस निरीक्षक, 4 उपनिरीक्षक व 66 कर्मचारी आहेत. या पोलीस ठाण्यात वीस वर्षांपूर्वीच्या लोकसंख्येनुसार 73 कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. परंतु सध्या फक्‍त 66 कर्मचारी हजर असतात. या कर्मचाऱ्यांच्या जीवावर 23 गावांतील कायदा व सुव्यवस्था अवलंबून आहे. सध्या लोणी काळभोर परिसरात नागरिकरणाचा वेग प्रचंड आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढली आहे. हे मनुष्यबळ तोकडे पडत आहे. येथे साधारण 100 कर्मचाऱ्यांची गरज आहे.

लोणीकंद अंतर्गत गुन्ह्यांची संख्या सरस
लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पंचवीस गावे येत आहेत. एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एक पोलीस निरीक्षक (गुन्हे) दोन सहायक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक, व इतर कर्मचारी आहेत. जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनपैकी लोणीकंद पोलिस ठाण्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या जास्त आहे. गुन्हे दाखल होण्यात जिल्ह्यात पहिला नंबर आहे. शहरीकरण, रस्त्याच्या समस्या, संवेदनशील भाग आदी कारणांमुळे पोलिसांना कमी मनुष्यबळात जादा काम करावे लागत आहे. पुणे शहरात असणाऱ्या पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांचे आणि लोणीकंदमधील गुन्ह्यांचे प्रमाण सारखे आहे. मात्र, तक्रारींवर तातडीने कारवाई करण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत. यातील वाघोली, लोणीकंद, वाडेबोल्हाई, केसनंद, शिरसवडी, अष्टापूर, पिंपरी सांडस, न्हावी सांडस, डोंगरगाव, बुर्केगाव, शिंदेवाडी, कोलवडी, साष्टे, बिवरी, आव्हाळवाडी, भावडी, तुळापूर, बकोरी, पेरणे, मांजरी खुर्द, हिंगणगाव, वडगाव शिंदे आदी गावांच्या लोकसंख्येत वाढ होत असल्याने गुन्ह्यांचे प्रमाण वाढू लागले आहे.

(संकलन- दत्तात्रय गायकवाड, राजेंद्र काळभोर) 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)