93 खासगी ट्रॅव्हल्स बसेसवर पोलिसांची कारवाई
पुणे – सरकारी नियमांचे उल्लंघन करत जादा भाडे आकारणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स चालकांना वाहतूक विभागाने दणका दिला आहे. दि. 23 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाकडून 93 खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई करण्यात आली.
सरकारी नियमांनुसार खासगी कंत्राटी प्रवासी वाहनांचे कमाल भाडे निश्चित केले होते. राज्य मंडळाच्या गाड्यांपेक्षा केवळ दीडपट जादा भाडे आकारण्याचा अधिकार खासगी ट्रॅव्हल्सचालकांना देण्यात आला आहे. एसटी बसेस तिकीट दराच्या दीडपटीपेक्षा जादा भाडे अनेक ट्रॅव्हल्स चालक आकारणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याची विशेष मोहीम वाहतूक शाखा आणि परिवहन विभागाने हाती घेतली होती. यानुसार शहराच्या उपनगरांमध्ये अधिक कारवाई करण्यात आली.
दिवाळीनिमित्त पुण्यातून गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. रेल्वे आणि एसटी बसेसचे आरक्षण “फुल्ल’ असल्याने प्रवासी नाईलाजाने खासगी बसचा पर्याय निवडतात. त्याचा फायदा घेऊन खासगी बसचालकांकडून भाडेवाढ करून प्रवाशांची लूट केली जाते. काही दिवसांपूर्वीच ट्रॅव्हल्सचालकांना सूचना देण्यासाठी वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली होती. तरी देखील चालकांकडून सर्रास प्रवाशांकडून जादा भाडे वसूल करण्यात येत होते.
ट्वीटर, व्हॉट्स ऍप, वाहतूक नियंत्रण कक्षात प्राप्त झालेल्या तक्रारी आणि नाकाबंदीनंतर ही कारवाई करण्यात आली. यापुढे देखील प्रवाशांकडून जादा प्रवास भाडे आकारल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेच्या वतीने सांगण्यात आले.