दाखल्यांसाठी आकारले जातेय नियमबाह्य शुल्क; नागरी सुविधा केंद्रचालकांचा मनमानी कारभार
चऱ्होली – भोसरी परिसरात असलेल्या नागरी सुविधा केंद्रांकडून विविध शासकीय दाखल्यांसाठी नियमबाह्य पैसे आकारले जात आहेत. शासकीय दाखले काढण्यासाठी या सुविधा केंद्रांवर नागरिकांची सारखी ये-जा सुरू असते. तर काही दिवसांपूर्वी म्हाडाच्या घरांसाठी सोडत झाली होती. या सोडतीमध्ये घरकुल लागलेल्या नागरिकांची कागदपत्रे तपासणी सुरू होणार असल्यामुळे कागदपत्रे जमा करण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू झाली आहे. वेळेच्या आत दाखले मिळविण्यासाठी नागरी सुविधा केंद्रांवर नियमबाह्य शुल्क आकारले जात असल्याचे वास्तव चित्र आहे. त्यामुळे शहरातील नागरी सुविधा केंद्र ग्राहकांसाठी असुविधा केंद्र ठरत आहेत.
दिवसेंदिवस दाखल्यांसाठी नागरिकांची गर्दी वाढत असल्याने येथे करोना संसर्गाचा धोका संभवत आहे. अशा परिस्थितीतसुद्धा फिजिकल डिस्टन्स पाळला जात नाही. त्यामुळे नागरी सुविधा केंद्रातच नागरिकांची असुविधा होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
शासकीय व शाळेच्या कामाकरिता आधार कार्ड, रेशन कार्ड, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलेअर, उत्पन्नाचा दाखला अशा विविध दाखल्यांसाठी नागरिकांकडून विचारपूस करण्यात येत आहे. तर दाखले काढण्यासाठी नागरिकांची केंद्रांवर गर्दी होत आहे. येणाऱ्या नागरिकांना हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर कुठेही ठेवण्यात आलेले नाही. तसेच सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे असताना थेट आत प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे छोट्याशा जागेत नागरिकांची गर्दी होत आहे. शासनाने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व व्यावसायिकांना नियमावली ठरवून दिली आहे. तरीही येथे कुठलेही नियम पाळताना दिसून येत नाहीत.
नागरी सुविधा केंद्रामधून मिळणाऱ्या शासकीय दाखल्यांसाठी अवाजवी शुल्क आकारले जात असल्याच्या सामान्य नागरिकांच्या तक्रारी आहेत. रेशन कार्ड काढण्यासाठी आलेल्या गणेश सावंत यांना दीड हजार रुपये एका ठिकाणी शुल्क सांगण्यात आले. तर दुसऱ्या ठिकाणी दोन हजार रुपये खर्च सांगण्यात आला. नॉन क्रिमिलेअरसाठी दीड हजार तर उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तीनशे ते पाचशे रुपये खर्च नागरिकांकडून घेतल्या जात आहे.
शासकीय नियमानुसार या दाखल्यासाठी लागणारे शुल्क शासनाने ठरवून दिले आहे. मात्र, शासनाने ठरवून दिलेल्या विविध दाखल्यांसाठीचे लागणारे शुल्क किती आहे ही माहिती नागरी सुविधा केंद्रात कुठेही लावलेली दिसत नाही. उलट नागरिकांनी जास्त शुल्क असल्याचे बोलले तर सगळीकडे एवढाच खर्च येत असल्याचे सांगितले जात असून त्यांना हुसकावून लावण्यात येते, अशी संतप्त प्रतिक्रिया या वेळी उपस्थितांनी दिली.