म्युझिक क्‍लास चालकाला खंडणी मागणारे जेरबंद

नातेवाईकांना ठार करण्याची दिली धमकी : 30 जुलैपर्यंत कोठडी

पुणे – म्युझिक क्‍लास चालकाकडे सहा लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तिघांना कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली. फिर्यादीला “तुझी पत्नी, मुलगी, मेहुणा या सर्वांची आम्हाला माहिती आहे. सहा लाख रुपये दिले नाही, तर सर्वांना ठार मारू’ अशी धमकी देऊन खंडणी मागण्यात आली होती. यात खंडणी स्वीकारताना तिघांना कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अतुल क्षेत्रे (37, रा., लोहगाव), अनिकेत ओव्हाळ (32, धानोरी जकात नाका) आणि सनी शेट्टी (26, रा. टिंगरेनगर) अशी अटक तिघांची नावे आहेत. तर, श्रीकुमार स्टीव्ह यांनी फिर्याद दिली आहे.

स्टीव्ह हे कोरेगाव पार्क सेंट्रल पार्क हॉटेलजवळ म्युझिक क्‍लास सुरू करणार आहेत. सध्या त्याची तयारी सुरू आहे. आरोपी दि. 21 जुलै रोजी दुपारी अॅॅडमिशनच्या बहाण्याने स्टीव्ह यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये आले. तेव्हा स्टीव्ह यांनी अॅॅडमिशन सुरू नसल्याचे सांगितले. त्यावर आरोपींनी नातेवाईकांची माहिती असल्याचे सांगितले. तसेच त्यातील एकाने स्टीव्ह यांना मारहाण करून 6 लाख रुपये मागितले. पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी देत रोख साडेचार हजार रुपये, एटीएम कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, गिटार तसेच एटीएम कार्डद्वारे 3 हजार रुपये असा एकूण 1 लाख 27 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल काढून घेतला. तसेच 4 लाख 50 हजार रुपयांचा सही केलेला धनादेश घेतला. त्यानंतर त्यांना कारमधून विमानतळ रस्ता, सिम्बायोसिस कॉलेज मैदानावर नेत 6 लाख रुपयांची व्यवस्था करण्यास सांगितसे. याबाबत पोलिसांकडे तक्रार दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर आरोपी स्टीव्ह यांना फोनवरून वेळोवेळी मागणी करत होते. दरम्यान गुरूवारी (दि. 26) आरोपींनी फिर्यादीकडे 6 लाख रुपये घेण्यासाठी येत असल्याचे सांगितले. स्टीव्ह यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून फिर्यादींच्या टिंगरेनगर येथील कार्यालयात आरोपींना अटक केली.

पोलीस उपआयुक्त ज्योतिप्रिया सिंह आणि सहायक पोलीस आयुक्त जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बहाद्दरपूर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गणेश माने, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश लंघे आणि कर्मचारी दिनेश शिंदे, विनोद साळुंके, संदीप गायकवाड, रियाज शेख, अनिल मंदे, गणेश गायकवाड, संदीपकुमार गर्जे, निशिकांत सावंत यांनी सापळा रचून आरोपींना जेरबंद केले.

दरम्यान, या तिघाही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी टी. एम. निराळे यांनी 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारी पक्षातर्फे ऍड. मैथिली काळवीट यांनी कामकाज पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)