औरंगाबाद – वीजेची कामे करण्यासाठी, घरगुती वीज बिल भरण्यासाठी, विज जोडणीसाठी, शेतकऱ्यांच्या वीजपंपाचे बिल भरण्यासाठी वायरमनने ग्राहकांकडून पैसे घेतले मात्र त्याची कोणतीही पावती दिली नाही. याप्रकरणी नागरिकांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता संबंधित वायरमनला निलंबित करण्यात आले आहे. संजय चाबुकस्वार असे निलंबित करण्यात आलेल्या वायरमनचे नाव आहे.
हा प्रकार पैठण तालुक्यातील नवगाव येथे घडला आहे. वायरमनच्या कारनाम्याची संपूर्ण तालुक्यात चर्चा होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून महावितरण विभागाकडून थकीत वीजबिल विरोधात कारवाई करत, वसुली केली जात आहे. दरम्यान याचाच फायदा घेत चाबुकस्वार यांनी ग्राहकांकडून वीज बिलाची रक्कम वसूल करून स्वतःच हडप केली.
पैसे देऊनही चाबुकस्वार कोटेशन देत नसल्याने नागरिकांना संशय आला. त्यामुळे त्यांनी चाबुकस्वार यांच्याकडे तगादा लावला. मात्र प्रत्येकवेळी उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने नागरिकांनी थेट वरिष्ठांकडे तक्रार केली. नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर वरिष्ठांनी याबाबत चौकशी सुरु केली. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. तर चाबुकस्वार यांना अखेर शनिवारी निलंबित करण्यात आल्याची माहिती महावितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.