पुणे – वाढत्या रुग्णसंख्येबरोबर बेडची संख्याही वाढवणे हे महापालिकेसमोर मोठे आव्हान आहे. महापालिकेने जवळपास सर्वच खासगी रुग्णालयांमधील बेड नियंत्रणाखाली आणले आहेत. मात्र ज्यांनी ताब्यात दिले नाहीत; त्यांच्याकडील बेड ताब्यात घेण्यासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्वत:च बाह्या सरसावल्या आणि मंगळवारी ते थेट त्या रुग्णालयांमध्ये गेले आणि 50 बेड ताब्यात घेतले.
शहरातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 50 हजारांच्या पुढे गेली आहे. सुमारे 5 हजार रुग्ण ऑक्सिजनवर तर एक हजारांहून अधिक रुग्ण व्हेंटिलेटवर आहेत. याशिवाय होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांची प्रकृती खालावल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची मागणीही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने सीओईपी जम्बो रुग्णालयामध्ये 625 रुग्णांवर उपचाराची सुविधा निर्माण केली आहे.
तसेच ईएसआय हॉस्पिटलसह लष्कराच्या रुग्णालयातील बेडही ताब्यात घेतले आहेत. यासोबतच खासगी रुग्णालयांतील बेडही ताब्यात घेण्याची प्रक्रिया वेगाने राबवली जात आहे. आजमितीला शहरातील जवळपास साडेसात हजारांहून अधिक करोना बाधितांवर उपचार सुरू असून, तेवढे बेड फुल्ल आहेत.
यामध्ये जिल्ह्यातून आणि बाहेरून येणाऱ्या रुग्णांची संख्याही अधिक आहे. सौम्य लक्षणे असलेल्या परंतु विलगीकरणाची सुविधा नसलेल्या नागरिकांसाठीही चार विलगीकरण कक्षांमध्ये साडेबारांशेहून अधिक बेडची सुविधा निर्माण करण्यात आली आहे.
मात्र, रुग्णवाढीचा आणि त्यातही गंभीर रुग्ण वाढीचा दर पाहता महापालिकेने खासगी रुग्णालयातील अधिकाधिक बेड उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कोविडसाठी अतिरिक्त बेड उपलब्ध करून न देणाऱ्या खासगी रुग्णालयांत स्वत: जाऊन अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनीही अनेक बेड ताब्यात घेतले आहेत.
आयुक्त विक्रम कुमार यांनी मंगळवारी खराडी येथील एशिया कोलंबिया आणि औंध येथील मेडीपॉईंट रुग्णालयाला भेट देऊन तेथील 50 हून अधिक बेड तातडीने ताब्यात घेतले. या दोन्ही ठिकाणी सुमारे 50 ऑक्सिजन बेडस् असून, त्यापैकी पाच ते सहा व्हेंटिलेटर बेड आहेत.