अतिरिक्‍त आयुक्‍तच विभाग प्रमुखांच्या भेटीला

पहिल्यांदाच घडलेल्या प्रकाराने अधिकारीही गडबडले
पुणे – अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार शुक्रवारी स्वीकारलेल्या शांतनू गोयल यांनी पालिका अधिकाऱ्यांना आश्‍चर्याचा धक्काच दिला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी महापालिका मुख्य इमारतीमधील आपल्याकडे असलेल्या खाते प्रमुखांच्या कार्यालयांना अचानक भेट दिली. त्यामुळे हे अधिकारी चांगलेच गडबडून गेले. यावेळी गोयल यांनी संबंधित खात्यांची माहितीही घेतली. त्यामुळे अशा प्रकारे पदभार घेतल्यानंतर खाते प्रमुखांना आपल्या दालनात बोलवून बैठक न घेता त्यांनी त्यांच्याच कार्यालयात जाऊन भेट देणारे गोयल हे महापालिकेच्या इतिहासातील पहिले अतिरिक्त आयुक्त आहेत.

महापालिकेच्या तिसऱ्या अतिरिक्त आयुक्तपदावर गोयल यांची मंगळवारी शासनाकडून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी दुपारी पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी आपल्याकडे असलेल्या खात्यांची माहिती घेत उपस्थित अधिकाऱ्यांची भेट घेतली. यानंतर गोयल यांनी विद्युत, कामगार कल्याण, घनकचरा व्यवस्थापन, अतिक्रमण निर्मूलन, क्रीडा विभागासह इतर विभाग प्रमुखांची थेट त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांना आपल्या दालनात आलेले पाहून अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. या भेटीनंतर गोयल यांनी दोन्ही इमारतींची पाहणी करत त्यांनी इतरही कार्यालयांची माहिती घेतली आणि कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. त्यानंतर सायंकाळी या सर्व विभाग प्रमुखांची आपल्या कार्यालयात बैठक घेत कामाचा आढावा घेतला. दरम्यान, आतापर्यंत एखादा अतिरिक्‍त आयुक्त अथवा आयुक्त महापालिकेत नियुक्त झाल्यानंतर खाते प्रमुखांना आढावा घेण्यासाठी बोलवितात. मात्र, गोयल हे स्वत: अधिकाऱ्यांना भेटायला आल्याने अशी भेट घेणारे ते पहिले महापालिका आयुक्त असल्याचे अनेकांकडून सांगण्यात आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)