नवी दिल्ली : डोनाल्ड ट्रम्प हे 20 जानेवारीला अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. ट्रम्प यांच्या या शपथविधीच्या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी जाणार आहेत. भेटीच्यावेळी ट्रम्प प्रसासनाच्या प्रतिनिधींशीही जयशंकर यांच्या बैठका होणार आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने आज सांगण्यात आले.
ट्रम्प यांच्या शपथविधीच्या समारंभासाठी चीन, अर्जेंटिना, इटली, अल सल्वाडोर आणि हंगेरीसारख्या देशांच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आलेले आहे. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा पराभव केला होता. ट्रम्प यांच्या प्रशासनामध्ये जे.डी.वान्स हे अमेरिकेचे उपाध्यक्ष असणार आहेत.
ट्रम्प यांच्या भावी कार्यकाळातविविध मुद्यांवरील त्यांच्या धोरणांच्या मुद्यावरून अनेक देसांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामध्ये काही देशांवर आयात शुल्क लावले जाणे, वातावरण बदलविषयक सहकार्याची भूमिका आणि रशिया-युक्रेन दरम्यानच्या युद्धाच्या पार्श्वभुमीवर विदेश धोरणाच्या प्रादान्याच्या मुद्यांवरून ही चिंता व्यक्त केली जाते आहे. मात्र ट्रम्प यांची भारताबाबतची भूमिका सरकारात्मक असून अन्य देशांच्या तुलनेत अमेरिकेबरोबरच्या चांगल्या संबंधांसाठी भारताला अधिक संधी असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.
मोदींना निमंत्रण का नाही
ट्रम्प यांच्या शपथविधीच्या समारंभासाठी इतर अनेक देशांच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आले असले, तरी या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना का निमंत्रण देण्यात आलेले नाही, यावरून चर्चा सुरू झाली आहे. ट्रम्प आणि मोदी यांच्यातली मैत्री संपली का असाही प्रश्न उपस्थित होतो आहे.
गेल्यावर्षी अमेरिकेतल्या अध्यक्षीय निवडणुकीपुर्वी मोदी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेला उपस्थित राहण्यासाठी न्यूयॉर्कला गेले होते. त्यावेळी ट्रम्प यांनी मोदींची भेट घेण्याची च्छाही व्यक्त केली होती. मोदींच्या भेटीमुळे प्रचारात प्रतिमा उंचावण्यास मदत होईल, असा ट्रम्प यांचा अंदाज होता. त्याच दरम्यान अर्जेंटिनाचे अध्यक्ष झेवियर मिलेई, हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ओरबान आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी ट्रम्प यांना पाठिंबा दिला होता.
मात्र रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक या दोन्ही पक्षांचा प्रचार शिगेला पोचला होता. अशावेळी मोदींनी ट्रम्प यांची भेट घेतली असती, तर तो ट्रम्प यांच्या समर्थकांना आणि अमेरिकेतल्या जनतेलाही चुकीचा संदेश गेला असता. ट्रम्प यांना पाठिंबा दिला असता आणि जर कमला हॅरिस विजयी झाल्या असत्या तर अमेरिका- भारताच्या संबंधांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यताही होती.
ट्रम्प यांच्या पहिल्या अध्यक्षपदाच्या काळात झालेला हाऊडी मोदी हा २०१९ मधील कार्यक्रम राजकीय दृष्ट्या घोडचूक ठरली होती. त्यामुळेच मोदी आणि ट्रम्प यांची भेट होऊ शकली नव्हती. मात्र आता ट्रम्प यांच्या प्रसासनाबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी पुढाकार घेतला आहे.