एसटीच्या “स्मार्ट कार्ड’ प्राप्त करण्यासाठी मुदतवाढ

विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांची गैरसोय टाळणार

मुंबई – एसटी महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या विविध प्रवासदर सवलतींसाठी स्मार्ट कार्ड घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. पण बऱ्याच सवलत धारकांनी (विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग इत्यादी) अद्याप हे स्मार्ट कार्ड घेतलेले नाहीत. सध्या शाळा, महाविद्यालये सुरु झाली असून स्मार्टकार्ड अभावी विद्यार्थ्यांची तसेच ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग इत्यादी सवलत धारकांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आल्याने स्मार्ट कार्ड घेण्यास 1 जानेवारी 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी जाहीर केले.

सध्या शाळा, महाविद्यालये सुरु झाल्याने स्मार्ट कार्ड घेण्यासाठी एसटी केंद्रांवर विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आदी सवलत धारकांचीही गर्दी होत आहे. इतक्‍या मोठ्या प्रमाणातील सवलतधारकांना स्मार्टकार्ड देण्यासाठी काही कालावधी लागणार आहे.

त्यामुळे तोपर्यंत विद्यार्थी तसेच इतर सवलतधारकांची होत असलेली गैरसोय टाळण्यासाठी सध्या विद्यार्थ्यांना जुन्या पद्धतीच्या पासच्या आधारे तर इतर सवलत धारकांना प्रचलित ओळखपत्राच्या आधारे प्रवास सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून जुनीच पद्धती अवलंबण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्यातील एसटी महामंडळाच्या सर्व कार्यालयांना एसटी मुख्यालयातून सूचना देण्यात आल्या.

1 जानेवारी 2020 पासून मात्र सवलतीसाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य असेल. तत्पूर्वी म्हणजे 31 डिसेंबर 2019 अखेर संबंधित यंत्रणांकडे संपर्क साधून आपली स्मार्ट कार्ड काढून घ्यावीत, असे आवाहन रावते यांनी केले आहे. दरम्यान, सध्या ज्यांनी स्मार्ट कार्ड काढली आहेत त्यांना स्मार्ट कार्डच्या आधारे प्रवास सवलत देण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.