खरिपाच्या पीक कर्जासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

अध्यक्ष सीताराम गायकर; नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाचा निर्णय

नगर -खरिपाच्या 2020-21 या वर्षातील हंगामासाठी पीक कर्ज वाटपास आता 30 सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी ही माहिती दिली. 

नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने खरिपाच्या कर्ज वाटपास 15 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली होती. तथापि, शेतकऱ्यांची मागणी व करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी वेळेत कर्जासाठी अर्ज करू शकले नाहीत, या मुद्याचा विचार करुन पीक कर्ज वाटपाची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बॅंकेचे उपाध्यक्ष रामदास वाघ व ज्येष्ठ संचालक शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले.

नगर जिल्ह्यात यंदा सर्वत्र पाऊस चांगला झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पीक कर्जासाठी जिल्हा बॅंकेकडे मोठ्या प्रमाणावर कर्ज मागणी होत आहे. बॅंकेने शेतकऱ्यांच्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीमार्फत पुरवणी कर्ज मागणीस मंजुरी दिली आहे. अद्याप अनेक शेतकरी सभासदांनी कर्ज उचल केली नसल्याने, त्यांची पीक कर्जाची मागणी येत आहे. 

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत लाभ मिळाल्यानंतर ज्या शेतकरी सभासदांचे कर्ज खाते निरंक झालेले आहे, अशा शेतकरी सभासदांकडून नव्याने खरीप पीक कर्जाची मागणी होत आहे. तसेच जिल्ह्यातील काही सेवा संस्थांना तांत्रिक अडचणीमुळे कर्ज वाटपास विलंब झालेला आहे. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे बॅंकेतर्फे सांगण्यात आले.

उद्दिष्टापेक्षा अगोदरच जास्तीचे कर्जवाटप..!
सरकारने चालू खरीप हंगामासाठी 1 हजार 498 कोटी रुपये वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. ते पूर्ण करुन बॅंकेने उद्दिष्टापेक्षा जास्त कर्ज वाटप केलेले आहे. बॅंकेने 2 लाख 90 हजार 985 शेतकरी सभासदांना तब्बल 1 हजार 769 कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. बॅंकेने कर्ज वाटपाच्या वाढवून दिलेल्या मुदतीचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष गायकर, उपाध्यक्ष वाघ व ज्येष्ठ संचालक कर्डिले यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.