ट्रान्सफर ऑफ क्रेडिट्सच्या लाभासाठी आता १० जूनपर्यंत मुदतवाढ

मुंबई: कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ट्रान्सफर ऑफ क्रेडिट्सचा लाभ घेण्यासाठी संबंधित शाळेमार्फत 10 जूनपर्यंत अर्ज करता येतील. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी ही माहिती दिली. यापूर्वी ही मुदत15 मेपर्यंत होती.

मार्च 2019 च्या इयत्ता दहावीच्या प्रमाणपत्र परीक्षेकरिता ट्रान्सफर ऑफ क्रेडिटसचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी माध्यमिक शाळेमार्फत राज्य मंडळाने विहित केलेल्या नमुन्यात अर्ज करुन नोंदणी करावी. नमुना अर्ज मंडळाच्याwww.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर डाऊनलोड करुन प्रिंट काढण्यासाठी उपलब्ध आहे. शैक्षणिक वर्ष 2018-19 पूर्वी कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी अर्जांची प्रिंट काढून 10 जूनपर्यंत अर्ज भरावा. हा अर्ज तो ज्या माध्यमिक शाळेतून अंतिमत: माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेला प्रविष्ट झाला आहे त्या शाळेच्या मुख्याध्यापक/प्राचार्यांची सही व शिक्का घेऊन अर्ज विभागीय मंडळात जमा करावा. अर्जासोबत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, सर्व परीक्षांचे गुणपत्रक आणि कौशल्य सेतू अभियान प्रमाणपत्र यांच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात.

शासन निर्णयातील तरतुदीनुसार कौशल्य सेतू अभ्यासक्रमाच्या एका कामासाठी दोन विषयांचे याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार देय असलेल्या एक किंवा दोन वर्षांसाठी ट्रान्सफर ऑफ क्रेडिट्स देण्यात येतील. माध्यमिक शाळांनी वेळेत याबाबत कार्यवाही पूर्ण करावी.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.