महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांचे आदेश
पुणे – करोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने ठेकेदारांची बिलांना तसेच कामांनाही दि.30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. 31 मार्चला महापालिकेचे आर्थिक वर्ष संपल्याने मागील दोन-तीन महिन्यांत शहरात झालेल्या विकासकामांची बिले अदा करण्याबाबत प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कुठलेच निर्देश न मिळाल्याने मागील तीन-चार दिवसांपासून ठेकेदार बिलांच्या पूर्ततेसाठी क्षेत्रीय कार्यालयांमध्ये गर्दी करत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी हा निर्णय घेण्यात आला आहे.
करोनामुळे मागील महिनाभरापासून महापालिका प्रशासन आरोग्य व्यवस्थेमध्ये गुंतले आहे. राज्य आणि पाठोपाठ केंद्र सरकारनेही 21 दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा केल्याने प्रशासनाने सर्व विकासकामे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हातावर पोट असलेला मजूर वर्ग अन्नधान्य खरेदीसाठी गाठीशी पैसे नसल्याने गावी परतू लागले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या मुख्य विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयांच्यावतीने सुरू करण्यात आलेली सर्वच कामे तूर्तास सुरू होणे आणि जी कामे पूर्ण झाली आहेत, त्यांची मोजमापे आणि बिलिंग 31 मार्चअखेर शक्य नसल्याने या कामांना आणि चालू आर्थिक वर्षाच्या खर्चातून बिले अदा करण्यास 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्याचे आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत.
यासाठी सर्व खातेप्रमुख, उपायुक्त आणि 15 क्षेत्रीय कार्यालयांचे सहाय्यक आयुक्तांनी 25 मार्चपर्यंत वर्क ऑर्डर दिलेल्या कामांची यादी, अंदाजपत्रकीय तरतूद, कामाची रक्कम, 31 मार्चपूर्वी खर्च झालेली रक्कम तसेच 2020 -21 च्या अंदाजपत्रकातून आवश्यक असलेली तरतूद याची विहीत तक्त्यामध्ये माहिती 5 एप्रिल पूर्वीपर्यंत मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी यांच्याकडे पाठवावी, असे आदेश आदेशात नमूद केले आहे.
दरम्यान, चालू आर्थिक वर्षामध्ये दोन निवडणुकांची आचारसंहिता, लांबलेला मान्सून यामुळे महापालिकेच्या विकासकामांच्या निविदा काढण्यास व त्याच्या वर्क ऑर्डर देण्यास विलंब लागला आहे. यामुळे प्रशासनाने निविदा प्रसिद्ध करण्यासाठी मार्चमध्ये पहिल्या आठवड्यापर्यंत मुदत वाढवली होती. अखेरच्या टप्प्यामध्ये उरलेल्या निधीचे वर्गीकरण करून मोठ्या प्रमाणावर निविदा काढण्यात आल्या आहेत. या धबडग्यात तरतुदीपेक्षा अधिक रकमेच्या निविदा काढण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्याने ड्रेनेज विभागाच्या अधीक्षकासह एकाला निलंबीतही करण्यात आले आहे. त्यामुळे कामांची तपासणी केल्यानंतरच बिले अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून करोनाशीच्या पार्श्वभुमीवर मनुष्यबळ खर्ची होत असल्यानेही कामांची बिले देण्यासाठीची मुदत वाढण्याची चिन्हे आहेत.